हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 16:41 IST2025-10-14T16:39:12+5:302025-10-14T16:41:55+5:30
Qatar Airways Flight Emergency Landing: दोहाहून हाँगकाँगला जाणाऱ्या कतार एअरवेजच्या एका विमानाचे अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
दोहाहून हाँगकाँगला जाणाऱ्या कतार एअरवेजच्या एका विमानाचे अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या विमानात मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाने अहमदाबादविमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे विमानतळावर मोठी खळबळ उडाली. ही घटना आज (१४ ऑक्टोबर २०२५) दुपारच्या सुमारास घडली असून सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
Qatar Airways Flight QR816 from Doha to Hong Kong was diverted to Ahmedabad, made a precautionary emergency landing due to a technical issue. The aircraft landed safely at around 2:30 PM, and all passengers are safe. Technical checks are currently being carried out to assess the…
— ANI (@ANI) October 14, 2025
विमानतळाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दोहा ते हाँगकाँग या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळताच, दुपारी २:१२ वाजता अहमदाबाद विमानतळावर पूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली. विमानाचे दुपारी २:३२ वाजता सुरक्षितपणे लँडिंग करण्यात आले. त्यानंतर अवघ्या सहा मिनिटांत म्हणजे २.३८ वाजता 'पूर्ण आणीबाणी' मागे घेण्यात आली. या संपूर्ण घटनेदरम्यान विमानतळाचे कामकाज सुरळीत राहिले आणि इतर उड्डाणांवर कोणताही परिणाम झाला नाही.
विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद दिला. नेमके कशामुळे विमानात तांत्रिक बिघाड झाला? यामागचे कारण जाणून घेण्यासाठी अधिकृत चौकशी सुरू करण्यात आली. तसेच प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी आवश्यक ती व्यवस्था केली.
या घटनेत सर्व प्रवासी सुरक्षित असले तरी, यामुळे बरोबर चार महिन्यांपूर्वी १२ जून २०२५ रोजी घडलेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण गुजरात हादरले होते. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI171 (बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर) उड्डाणानंतर केवळ १.७ किलोमीटर अंतरावर असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात आदळले होते. या दुर्घटनेत विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेतून विश्वास कुमार रमेश हा एकमेव प्रवासी बचावला होता.