संसदेबाहेर धक्काबुक्की: राहुल गांधींची चौकशी केली जाण्याची शक्यता; पोलीस CCTV फुटेज मागवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 05:33 IST2024-12-21T05:32:43+5:302024-12-21T05:33:11+5:30
दोन जखमी खासदारांचे पोलिस नोंदविणार जबाब; या प्रकरणाचा तपास दिल्ली पाेलिसांचे गुन्हे अन्वेषण पथक करणार. लाेकसभा अध्यक्ष व राज्यसभा सभापती यांनी राहुल गांधी यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती राष्ट्रीय महिला आयाेगाने केली आहे.

संसदेबाहेर धक्काबुक्की: राहुल गांधींची चौकशी केली जाण्याची शक्यता; पोलीस CCTV फुटेज मागवणार
नवी दिल्ली :संसद परिसरात गुरुवारी खासदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीत जखमी दाेन सदस्यांचे पाेलिस जवाब नाेंदवण्याची शक्यता आहे. या प्रकरणात विराेधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही चाैकशीसाठी बाेलावले जाऊ शकते. शिवाय संसदेच्या सचिवालयाकडे या दिवशीचे संसदेबाहेरील सीसीटीव्ही फुटेज पोलिस मागू शकतात.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता दिल्ली पाेलिसांचे गुन्हे अन्वेषण पथक करणार आहे. लाेकसभा अध्यक्ष व राज्यसभा सभापती यांनी राहुल गांधी यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती राष्ट्रीय महिला आयाेगाने केली आहे. संसदेबाहेर निदर्शने झाली, त्यावेळी राहुल गांधी यांनी माझ्याशी गैरवर्तन केल्याचा आराेप भाजप खासदार फॅंगनाॅन काेन्यान यांनी केला हाेता.
या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता संसद मार्ग पोलिस ठाण्यात दुखापत करणे, इतरांच्या जीविताला धोका पोहोचवणे, धमकी देणे अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजप सदस्यांनी याबाबत तक्रार देताच काही तासांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दावे-प्रतिदावे
काँग्रेसने आपल्या सदस्यांवरील आरोप फेटाळले असून भाजप खासदारांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना धक्का दिला आणि राहुल गांधी यांच्याशी धक्काबुक्की केली, असा आरोप केला तर, या प्रकरणात राहुल यांच्यासह काँग्रेस सदस्य जबाबदार आहेत, असे भाजपने म्हटले.
हे तर सत्ताधाऱ्यांचे नैराश्य : प्रियांका
राहुल गांधी यांच्यावर एफआयआर नोंदविण्याचा प्रकार म्हणजे सत्ताधारी पक्षांत असलेल्या नैराश्याचा परिणाम असल्याचे काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.
दोन्ही खासदारांच्या प्रकृतीत सुधारणा
धक्काबुक्कीत जखमी दोन्ही भाजप खासदारांवर राममनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
‘एक देश एक निवडणूक’ विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्यास मंजुरी
‘एक देश एक निवडणूक’ अर्थात देशात लाेकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासंबंधीचे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावाला लोकसभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. या विधेयकावर विचार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीत लोकसभेचे २७ तर राज्यसभेचे १२ असे एकूण ३९ सदस्य असतील. ही समिती आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात पहिल्या दिवशी अहवाल सादर करेल.
लोकसभेतून या सदस्यांची निवड
भाजप : पी. पी. चौधरी, सी. एम. रमेश, बांसुरी स्वराज, पुरुषोत्तम रूपाला, अनुराग ठाकूर, विष्णुदयाल शर्मा, भर्तृहरि महताब, संबित पात्रा, अनिल बलुनी, विष्णुदत्त शर्मा, बैयजंत पांडा आणि संजय जायसवाल. काँग्रेस : प्रियांका गांधी वाड्रा, मनीष तिवारी, सुखदेव भगत.
इतर सदस्य : धर्मेंद्र यादव आणि छोटेलाल (सपा), कल्याण बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस), टी. एम. सेल्वागणपती (द्रमुक), (तेलुगु देसम) हरीश बालयोगी, (उद्धवसेना) अनिल देसाई, (राष्ट्रवादी काँग्रेस) सुप्रिया सुळे, (शिवसेना) श्रीकांत शिंदे, (लोक जनशक्ती पार्टी-रामविलास) शांभवी, (माकप) के. के. राधाकृष्णन, (राष्ट्रीय लोकदल) चंदन चौहान, (जन सेना पार्टी) बालाशौरी वल्लभनेनी.
राज्यसभेतून या सदस्यांची निवड : (भाजप) घनश्याम तिवारी, भुनेश्वर कलिता, के. लक्ष्मण, कविता पाटीदार, (जदयू) संजय झा, (काँग्रेस) रणदीपसिंह सुरजेवाला, मुकुल वासनिक, (तृणमूल काँग्रेस) साकेत गोखले, (द्रमुक) के. पी. विल्सन, (आप) संजय सिंह, मानस रंजन मंगराज (बिजद) आणि के. व्ही. विजयसाई रेड्डी (वायएसआर काँग्रेस).
राज्यसभेत ३० टक्के वेळ एकटे सभापती बोलले : ओब्रायन
हिवाळी अधिवेशनात राज्यसभेचे जेवढे कामकाज झाले त्यापैकी ३० टक्के वेळ एकटे सभापती जगदीप धनकड बोलल्याचा आरोप शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या संसदीय दलाचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसी सभापतींवर टीका करताना ओब्रायन बोलत होते. संसदेचे हिवाळी अधिवेश सुरू झाल्यानंतर १८ डिसेंबरपर्यंत राज्यसभेचे एकूण कामकाज ४३ तास चालले. त्यापैकी जवळपास साडेचार तास एकटे धनकड बोलेले असल्याचा दावा ओब्रायन यांनी केली.ओब्रायन यांनी धनकड यांच्यावर आरोप केला असला तरी राज्यसभेचे सभापती किंवा सदस्य यांच्या बोलण्याच्या वेळेची कोणतीही अधिकृत नोंद करण्यात आलेली नाही. राज्यसभेत झालेल्या ४३ तासांच्या कामकाजा दरम्यान १० तास विविध विधेयकांवर चर्चा झाली. यापैकी साडेसतरा तास संविधानावर चर्चा झाली.