केसगळती थांबवण्याच्या नादात अडकले; औषध लावल्यानंतर ६७ लोकांसोबत धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 11:35 IST2025-03-18T11:33:55+5:302025-03-18T11:35:05+5:30
केसगळती थांबवणे पडलं महागात; शिबिरातून लोक पोहोचले रुग्णालयात

केसगळती थांबवण्याच्या नादात अडकले; औषध लावल्यानंतर ६७ लोकांसोबत धक्कादायक प्रकार
Punjab Crime: केस गळण्याच्या त्रासाने अनेकजण त्रस्त असतात. यामध्ये तरुणाईचा मोठ्या प्रमाणात समोवश आहे. टक्कल पडण्याने अनेक तरुण नैराश्यात गेल्याचेही अनेक उदाहरणं आजूबाजूला पाहायला मिळतात. त्यामुळे डोक्यावरचे केस परत मिळवण्यासाठी लोक काय काय नाही करत.विविध प्रकारचे उपाय करून पाहिल्यानंतर काहीजण डॉक्टरांकडे जातात. अशातच पंजाबमध्येही केसांच्या उपचारांसाठी गेलेल्या काही जणांसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. डोक्यावर केस उगवून दाखवणाऱ्या चमत्कारी शिबिरातून काहीजण रुग्णालयात पोहोचले आहेत.
पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात केसांवरील उपचाराच्या एका शिबिरात सहभागी झाल्यानंतर काही जणांना डोळ्यांचा संसर्ग झाला. यानंतर सर्वांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगरूरमध्ये टक्कल पडल्यामुळे उपचारासाठी आलेल्या शेकडो लोकांना डोळ्यात गंभीर संसर्ग झाला. कालीदेवी मंदिरात आयोजित केलेल्या शिबिरात डोक्याला लावलेल्या औषधाने काही जणांना रिॲक्शन झाली. त्यामुळे ६७ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोशल मीडियावर या शिबिराची जोरदार चर्चा होती. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. मात्र औषध लावल्यानंतर लोकांच्या डोळ्यांना जळजळ, सूज आणि संसर्गाच्या तक्रारी येऊ झाल्या.
संगरूर येथील कालीदेवी मंदिरात रविवारी केसांवरील उपचाराच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. केसगळतीची समस्या दूर करण्याचा दावा या शिबिरात करण्यात आला होता. शिबिरात आलेल्या लोकांना केसांना लावण्यासाठी विशेष प्रकारचे तेल देण्यात आले. पण हे तेल लावल्यानंतर काही वेळातच अनेकांना डोळ्यांची जळजळ आणि इतर तक्रारी सुरू झाल्या. औषध लाल्यानंतर काही वेळाने डोळ्यात जळजळ होऊ लागली. ती हळूहळू वाढत गेली आणि सूज येऊ लागली. रात्री त्रास आणखी वाढल्याने ६७ जण तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल झाले. यापैकी अनेकांना डोळ्यांना गंभीर संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या प्रकारानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केस उपचार शिबिराच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे या शिबिराचे आयोजन करणाऱ्या दोघांनी कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय किंवा तज्ज्ञांच्या परवानगीशिवाय हा कार्यक्रम आयोजित केल्याचे तपासात समोर आले आहे.