Bhagwant Mann on PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच पाच देशांचा दौरा करून परतले. त्यांच्याया दौऱ्यावरुन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री मान म्हणाले की, पंतप्रधान अशा देशांमध्ये जातात, ज्यांची नाव कोणालाही माहिती नसतात. यावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाने मान यांच्या टिप्पण्या बेजबाबदार आणि खेदजनक असल्याचे म्हटले आहे.
विधानसभेत बोलताना पंजाबचे मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर प्रश्न उपस्थित करण्याचा आपल्याला अधिकार नाही का? परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करण्याचा आपल्याला अधिकार नाही का? जेव्हा पाकिस्तानशी युद्ध झाले, तेव्हा जगातील कोणत्याही देशाने आम्हाला पाठिंबा दिला नाही. मग अशा परदेश दौऱ्यांचा काय फायदा? पंतप्रधान अशा देशांमध्ये जातात, ज्यांचे नावही कोणालाही माहिती नाही, त्यांना तिथे सर्वोच्च सन्मान दिला जातोय. त्या देशांची लोकसंख्या इतकी आहे की, जितके लोक आपल्या पंजाबमध्ये जेसीबी मशीन पाहण्यासाठी येतात.
जेव्हा पंतप्रधान विमानात बसतात, तेव्हा विचारतात की कोणता देश खाली आहे? मग तिथे विमान उतरवतात, अशी खोचक टीकाही मान यांनी केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१५ मध्ये अचानक झालेल्या पाकिस्तान दौऱ्याचा संदर्भ देत एक व्यंग्यात्मक टिप्पणीही केली. ते म्हणाले की, सामान्य नागरिक पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत, परंतु पंतप्रधान निमंत्रण नसताना बिर्याणी खाण्यासाठी तिथे पोहोचतात. आम्हाला देशभक्तीचे प्रमाणपत्र देऊ नका, आम्ही बलिदान देऊन देश स्वतंत्र केला आहे.
त्यांनी दिलजीत दोसांझच्या 'सरदार जी ३' या चित्रपटाभोवतीच्या वादावरही भाष्य केले. ते म्हणाले, दिलजीत दोसांझच्या चित्रपटावर प्रश्न उपस्थित केले जातात. पाकिस्तानमध्येही लोक पंजाबी बोलतात, आपली संस्कृती त्यांच्याशी सामायिक आहे. म्हणूनच तिथल्या एका कलाकाराने दिलजीतच्या चित्रपटात काम केले. हा चित्रपट ऑपरेशन सिंदूरच्या आधी बनवण्यात आला होता, आता ते म्हणतात की चित्रपट प्रदर्शित होऊ नये. पंतप्रधानांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवले अशी त्यांची जाहिरात येते, पण ते पंजाब आणि हरियाणामधील वाद संपवू शकत नाहीत, असेही मान म्हणाले.
पंतप्रधान मोदींचा परदेश दौरापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच ५ देशांना भेट दिली. पंतप्रधानांनी २ जुलै रोजी आपला दौरा सुरू केला, जो ९ जुलै रोजी पूर्ण झाला. या काळात पंतप्रधानांनी घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबियाला भेट दिली. ते ब्राझीलमध्ये झालेल्या ब्रिक्स परिषदेतही सहभागी झाले होते.