नागपुरातून लवकरच पुणे, अमृतसर एक्स्प्रेस
By Admin | Updated: February 12, 2015 02:27 IST2015-02-12T02:27:35+5:302015-02-12T02:27:35+5:30
नागपुरात राहणाऱ्या उत्तर भारतीय नागरिकांची मागील अनेक दिवसांपासून रिवाला थेट रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी होती.

नागपुरातून लवकरच पुणे, अमृतसर एक्स्प्रेस
नागपूर : नागपुरात राहणाऱ्या उत्तर भारतीय नागरिकांची मागील अनेक दिवसांपासून रिवाला थेट रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी होती. रिवा एक्स्प्रेस सुरू झाल्यामुळे त्यांची मोठी सुविधा झाली असून लवकरच नागपुरातून अमृतसर आणि पुण्यासाठी रेल्वेगाडी सुरूकरण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
नागपूर रेल्वेस्थानकावर नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या नागपूर-रिवा एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी या गाडीचा शुभारंभ केला. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अविनाश पांडे, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, आमदार कृष्णा खोपडे उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, नागपुरात घरेलू कामकाज करणारे रिवाचे अनेक नागरिक राहतात. त्यामुळे त्यांच्यासाठी रिवा एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून उत्तर भारतीय मोर्चाने केली होती. ही गाडी सुरू केल्याबद्दल त्यांनी रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले. नागपूरकर जनतेसाठी नव्या रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुपारी २.५० वाजता हिरवी झेंडी दाखवून त्यांनी नागपूर-रिवा एक्स्प्रेसचा शुभारंभ केला. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ. पी. सिंह, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. जयदीप गुप्ता, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. सुमंत देऊळकर, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी. एल. कोरी, सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस.जी. राव, व्ही.पी. डहाट, स्टेशन व्यवस्थापक संजयकुमार दाश आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)