पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 17:19 IST2025-08-29T16:42:23+5:302025-08-29T17:19:31+5:30
राहुल गांधी यांच्या 'व्होटर अधिकार यात्रा'दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?
राहुल गांधी यांच्या 'व्होटर अधिकार यात्रा'दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना २७ ऑगस्ट रोजी दरभंगा जिल्ह्यातील सिमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिठौली परिसरात घडली होती, जिथे काँग्रेसच्या मंचावरून एका अज्ञात व्यक्तीने हे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव मोहम्मद रिजीवी उर्फ राजा आहे. तो पिकअप व्हॅन चालक असून, त्याचे पंक्चरचे दुकानही आहे. दरभंगा सदरचे एसडीपीओ सुरेंद्र कुमार सुमन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नेमकं प्रकरण काय?
काँग्रेसच्या या सभेमध्ये एका तरुणाने पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपमानास्पद भाषा वापरली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष आदित्य नारायण मन्ना यांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता, ज्यामध्ये काँग्रेस नेते मोहम्मद नौशाद यांना मुख्य आरोपी बनवण्यात आले होते. या प्रकरणात ही पहिली अटक आहे.
एसडीपीओ सुरेंद्र कुमार सुमन यांनी सांगितले की, मोहम्मद रिजीवीची चौकशी सुरू असून, यामागे नेमका काय उद्देश होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील इतर दोषींवरही कारवाई केली जाईल.
आयोजकांनी मागितली होती माफी
या घटनेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने काँग्रेसच्या राजकारणाची पातळी यापेक्षा खाली कधीच गेली नव्हती, अशी टीका केली. यानंतर, रॅलीचे आयोजक नौशाद यांनी पंतप्रधान मोदींची माफी मागितली होती. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.