Pulwama Attack: जगभरात निषेध; मदत करण्याची पुतिन यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 05:50 IST2019-02-16T05:45:58+5:302019-02-16T05:50:01+5:30
दहशतवादाविरोधात भारताने आपली लढाई सुरू ठेवावी, तिला संपूर्ण सहकार्य व आवश्यक ती मदत करायला आम्ही तयार आहोत, असे रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे.

Pulwama Attack: जगभरात निषेध; मदत करण्याची पुतिन यांची ग्वाही
नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मदने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी तीव्र निषेध केला आहे. रशिया, अमेरिका,
फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इस्राईल, चेकोस्लावाकिया, तुर्कस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, भूतान आदी देशांनी हल्ल्याविषयी चिंता व्यक्त करताना, भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला कायमच पाठिंबा असल्याची ग्वाही दिली आहे.
दहशतवादाविरोधात भारताने आपली लढाई सुरू ठेवावी, तिला संपूर्ण सहकार्य व आवश्यक ती मदत करायला आम्ही तयार आहोत, असे रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही जवानांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी वा पुतिन यांनी थेट पाकिस्तानचे नाव घेण्याचे मात्र टाळले आहे. चीननेही या हल्ल्याचा निषेध केला आहे. मात्र, चीनच्या संदेशातही पाकिस्तानचे नाव घेण्यात आलेले नाही, तसेच जैश-ए-मोहम्मदचा सूत्रधार अझहर मसूद याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याला विरोध असल्याचे चीनने पुन्हा एकवार स्पष्ट केले आहे.
फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांड्रे झिगलर यांनी अतिरेकी हल्ल्याचा फ्रान्स निंदा करत आहे, असे म्हटले आहे. दहशतवादाच्या विरोधातील लढाईला फ्रान्सचा कायमच पाठिंबा आहे, असेही ते म्हणाले. नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका व मालदीव यांनीही दहशतवादाविरोधात एकत्र येऊन लढण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तुर्कस्तान, चेकोस्लावाकिया, आॅस्ट्रेलिया, इस्राईल, जर्मनी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे.