विवेकवाद्यांची...

By Admin | Updated: September 16, 2015 23:38 IST2015-09-16T23:38:07+5:302015-09-16T23:38:07+5:30

विवेकवाद्यांची चतुर्थी

The prudentialists ... | विवेकवाद्यांची...

विवेकवाद्यांची...

वेकवाद्यांची चतुर्थी
जवाहर बर्वे-
गोव्यात दिवाळीपेक्षाही चवथीला जास्त महत्त्व. आषाढात वातावरण ढगाळ व्हावे तसे चवथीच्या ऐन मोसमात वातावरण नुसते आनंदाळलेले, भक्ताळलेले असते. गणेशभक्तांसाठीच नव्हे, समस्त भाविकांसाठी भावभक्तीने ओथंबण्याचा हा हक्काचा क्षण. अशा या भावभक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणात मूर्त रूपाने चमत्कारी देवत्वाच्या संकल्पनेत न रमणारी, या आनंद सोहळ्यापासून उपेक्षित अथवा अलिप्त असणारी विवेकवादी मंडळी काहीतरी करत असतीलच ना! नेमकं काय करत असतील बुवा? कुतुहलाचा प्रश्न. उत्तरादाखल विवेकवाद्यांच्या जीवनक्रमात डोकावण्याचा हा एक प्रयत्न..

कामात देवत्व शोधा : सी. एल. पाटील
मडगावचे पोलीस निरीक्षक सी.एल. पाटील हे गोव्याच्या शासकीय सेवेतील एक प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी अधिकारी. चतुर्थीला तुम्ही काय करता, असा प्रश्न विचारताच त्यांनी क्रांतिकारी बातमीच दिली. म्हणाले, माझे कर्तव्य हाच माझा देव. मी माझ्या खुर्चीत कर्तव्यपूर्तीसाठी बसलोय. इथल्या पोलीस स्टेशनमध्ये 11 दिवस गणेश पूजन केले जायचे. त्यात कर्मचारी अडकून पडायचे. मला वेळेचा अपव्यय होऊ द्यायचा नव्हता. 11 दिवसांवरून हा सोहळा मी सात दिवसांवर आणला. स्थानिक पुढारी, मान्यवरांकडून खूप विरोध झाला. दबाव आला. मी ठाम राहिलो. बँडऐवजी दिंडीचा अवलंब करायला सांगितले. लोकांकडून फंड गोळा करण्यास मनाई केली. पूजेऐवजी सेवेस ज्यादा वेळ द्या, कामात देवत्व शोधा, असे बजावले.

विरंगुळा घेण्यास काय हरकत : नमन सावंत
साहित्य अकादमीचा युवा पुरस्कारप्राप्त लेखिका नमन सावंत यांच्या मते, महिला कर्मकांडाच्या वाहक असतात. मी एक महिला आहे; परंतु जाणीव झाल्यानंतर कर्मकांडे टाळण्याचा प्रयत्न केला. चतुर्थीच्या निमित्ताने माहेरी जाते ती माणसांना भेटण्यासाठी. त्याच निमित्ताने कधी न येणारे भाऊ-भावजय घरी भेटतात. सासरी मात्र रंगरंगोटी, पूर्वतयारीत समतेची जोपासना करते. मुलांसह मुलींनाही सहभाग घेण्यास सांगते. आनंद समसमान प्रमाणात विभागून जाईल याची काळजी घेते. नास्तिक असले तरी उत्सवी वातावरणात विरंगुळा घेण्यास काय हरकत आहे?

ज्ञानाची उपासना करतो : चंद्रकांत जाधव
फुले-आंबेडकरी विचारांचे साहित्यिक चंद्रकांत जाधव सांगतात, मी स्वत: मूर्तीपूजा मानत नाही. त्यामुळे चतुर्थीला मूर्तीची उपासना करण्याचा प्रश्नच नाही. त्या पाच दिवसांचा विनियोग आम्ही मुलांना ज्ञान देण्यासाठी करतो. धुळेर, ओरोस येथे युवकांसाठी बौद्धिक शिबिरे भरवितो. त्यात ज्ञानाचीच उपासना केली जाते. ज्ञान हे आराधनेने किंवा अलौकिक कृपेने प्राप्त होत नाही. त्यासाठी कठोर पर्शिम घ्यावे लागतात. हा वेळेचा सदुपयोग, असे मी मानतो.

पुस्तके वाचून काढतो : सोमू राव
गोवा सायन्स फोरमचे अध्यक्ष सोमू राव चतुर्थीच्या काळात वैचारिक पुस्तके वाचणे पसंत करतात. मुले मौज करण्याच्या मूडमध्ये असल्याने शिबिरे घेणे शक्य होत नाही. स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणारे काही शहरी बुद्धिवादी चतुर्थीच्या वेळी घरी जातात ते गणपतीसाठीच. निमित्त पुढं करतात माणसं भेटण्याचं; पण ही वैचारिक विसंगती आहे.

भावनांचा आदर करतो : कलानंद मणी
मी स्वत: मूर्तीपूजक नसलो तरी इतरांच्या भावनांचा आदर करतो. नव्या घरात मी गणपतीपूजन केले नाही. गृहप्रवेशाच्या वेळीही कोणतेच कर्मकांड न करता महात्मा गांधींच्या प्रतिमेला फुले वाहिली आणि वास्तुप्रवेश केला. निमंत्रितांनाही त्यात सहभागी करून घेतले. परंतु चतुर्थीच्या निमित्ताने मित्रमंडळींच्या घरी जातो. मी नास्तिक असल्याचे ठाऊक असूनही मी आल्याचे मित्रांना कौतुक वाटते. त्यानिमित्ताने चर्चा होते. मी माझी भूमिका मांडतो. हे प्रबोधनच नाही का? हा पीसफूल सोसायटीच्या कलानंद मणी यांचा प्रश्न मनाला पटतो.

काही गोष्टी कराव्या लागतात : हेमा नाईक
चतुर्थीचे चार-पाच दिवस कामांचा बोजा पडतो. अमूल्य वेळ वाया जातो याचे वाईट वाटते. मुलगा युगांक अस्वस्थ होतो. तो घरात राहातच नाही. पुंडलिक नाईकही आरती, भजन, पूजा असल्या कर्मकांडात सहभागी होत नाहीत. आम्ही मूर्तीपूजक नसल्याने टक्केटोमणेही ऐकून घ्यावे लागतात; परंतु काही गोष्टी मनात नसल्या तरी गावाकडील संबंध टिकावेत यास्तव कराव्या लागतात, हेही खरे. तंत्रज्ञानाचा हव्यास असलेले आम्ही कर्मकांडात अडकून पडतो याचेच वाईट वाटते. साहित्यिका हेमा नाईक यांची ही खंत.

Web Title: The prudentialists ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.