‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 05:44 IST2025-09-18T05:42:31+5:302025-09-18T05:44:45+5:30
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाइल रिजन अँड ॲपरेलचे (पीएम मित्र) भूमिपूजन मोदी यांनी केले. तसेच, ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ आणि ८वा राष्ट्रीय पोषण महिना या मोहिमांचाही शुभारंभ केला. यावेळी ते बोलत होते.

‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
धार : घटस्थापनेपासून अर्थात २२ सप्टेंबरपासून जीएसटी दर कमी होत आहेत. आपण स्वदेशी उत्पादने खरेदी करून त्याचा फायदा घेतला पाहिजे. प्रत्येक दुकानावर ‘गर्व से कहो यह स्वदेशी है’ असे लिहिलेले फलक लावले पाहिजेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाइल रिजन अँड ॲपरेलचे (पीएम मित्र) भूमिपूजन मोदी यांनी केले. तसेच, ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ आणि ८वा राष्ट्रीय पोषण महिना या मोहिमांचाही शुभारंभ केला. यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्व भारतीयांनी स्वदेशी वस्तूंचा वापर वाढविला पाहिजे. आपण स्वदेशीचा मंत्र विसरू नये. जे काही तुम्ही विकत घेता, ते आपल्या देशात बनवलेले असावे. भारतात बनलेल्या वस्तू विकणाऱ्या दुकानांवर ‘गर्व से कहो यह स्वदेशी है’ असा फलक असावा. २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करायचा आहे. त्याकडे जाण्याचा मार्ग स्वावलंबी भारत आहे. (वृत्तसंस्था)
भारतीय जवानांनी पाकला गुडघे टेकायला लावले
भारतीय जवानांनी अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर कसे जोरदार हल्ले केले याची माहिती जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर सांगत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्या अनुषंगाने मोदी म्हणाले, ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय जवानांनी पाकला गुडघे टेकायला लावले. पाकिस्तानातील एक दहशतवादी कसा रडत होता, हे जगाने मंगळवारी पाहिले आहे.
ते म्हणाले की, हा नवीन भारत आहे, जो अण्वस्त्रांच्या धमक्यांनाही घाबरत नाही. शत्रूच्या घरात घुसून भारत त्याच्यावर कारवाई करतो. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींच्या आणि मुलींच्या कपाळावरचे कुंकू पुसले. त्यामुळेच आम्ही ऑपरेशन सिंदूरची कारवाई करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.