Karachi Bakery Name : हैदराबादमधील प्रसिद्ध 'कराची बेकरी'समोर काही लोकांनी निदर्शने केली आहेत. भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यापासून कराची बेकरीसमोर असे प्रकार घडत आहेत. काही संघटना आणि स्थानिक लोक या बेकरीचे नाव बदलण्याची मागणी करत आहेत. हातात तिरंगा आणि गळ्यात भगवा स्कार्फ घालून काही लोक कराची बेकरीसमोर पोहोचले आणि त्यांनी बेकरीच्या नावाच्या फलकांवर काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली. यावेळी निदर्शन करणारे लोक जोरदार घोषणाबाजी करत होते. यावेळी लोकांनी बेकरीमध्ये तोडफोड करण्याचा प्रयत्न देखील केला.
हैदराबादमधील शमशाबाद येथील कराची बेकरी स्टोअरसमोर पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या गेल्या. यावेळी आंदोलकांनी दुकानाच्या नावाच्या फलकावर काठ्यांनी वार करून नुकसान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांच्या जमावाला रोखलं.
बेकरी चालकांनी उचललं मोठं पाऊल!
एकीकडे हा वाद वाढत असताना, बेकरी मालकांनी दुकानाबाहेरील नावचे फलक अर्धवट झाकून टाकण्यास सुरुवात केली आहे. या नावाच्या फलकांवरील 'कराची' हा शब्द झाकण्यात आला असून, केवळ 'बेकरी' हा शब्द दिसेल इतकाच फलक उघडा ठेवण्यात आला आहे. या दरम्यान कराची बेकरीभोवती मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आरजीआय विमानतळ पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, दुकानासमोर निदर्शने करून ग्राहकांना अडथळा आणल्याच्या आरोपाखाली निदर्शकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कराची बेकरी हा शहरातील एक मोठा ब्रँड आणि बेकरींची साखळी आहे. कराची बेकरी ही १०० टक्के भारतीय असल्याचे बेकरी मालकांनी आधीच स्पष्ट केले आहे. मात्र, आता या नावावरून मोठा वाद सुरू झाला आहे.