संरक्षण उत्पादनास चालना देणार
By Admin | Updated: February 19, 2015 01:29 IST2015-02-19T01:29:52+5:302015-02-19T01:29:52+5:30
संरक्षण उत्पादने आयात करणारा देश ही ओळख मिटवायची असेल तर देशातील संरक्षण उत्पादन दुप्पट केले पाहिजे,

संरक्षण उत्पादनास चालना देणार
बंगळुरू : संरक्षण उत्पादने आयात करणारा देश ही ओळख मिटवायची असेल तर देशातील संरक्षण उत्पादन दुप्पट केले पाहिजे, असे सांगत या उद्योगाला चालना देण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिली़ केवळ विक्रेते म्हणून नाही तर धोरण भागीदार म्हणून भारतात या, असे आवाहन विदेशी गुंतवणूकदारांना त्यांनी केले़ १० व्या ‘एअरो इंडिया एक्स्पो’च्या उद्घाटप्रसंगी मोदी बोलत होते़ देशासमोर सुरक्षेचे मोठे आव्हान आहे आणि याला तोंड देण्यासाठी अत्याधुनिक संरक्षण उपकरणे आणि सैन्य दलांच्या आधुनिकीकरणाची गरज आहे़ अशा स्थितीत संरक्षण उत्पादने आयात करणारा सर्वांत मोठा देश बनण्याऐवजी भारतातील संरक्षण उत्पादन दुप्पट करणे, हे आपले लक्ष्य असले पाहिजे, असे मोदी म्हणाले़
देशातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योगांचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची ग्वाही देत, मोदी पुढे म्हणाले की, संरक्षण क्षेत्रातही स्वत:च्या धोरणांसह उतरण्याचे भारताचे लक्ष्य आहे़ भारतात संरक्षण उत्पादन उद्योगाला स्पष्टपणे प्राधान्य देण्यात येईल़
मोठ्या उद्योगात खासगी क्षेत्राच्या भूमिकेचा विस्तार करण्याचे भारताचे प्रयत्न यामागे आहेत़ सर्व उद्योगांना समान संधी उपलब्ध करून देणे हे भारताचे लक्ष्य आहे, असेही मोदी म्हणाले़ भारत संरक्षण क्षेत्रातील आपल्या गरजेनुसार सुमारे ६० टक्के उत्पादने आयात करतो़ एका पाहणीनुसार, संरक्षण उपकरणांची आयात २० ते २५ टक्के कमी केल्यास भारत प्रत्यक्ष १ लाख ते १ लाख २० हजार कुशल रोजगार निर्मिती करू शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले़ बंगळुरूमध्ये बुधवारी उद्घाटन झालेला एअरो इंडिया एक्स्पो आतापर्यंतचा आशियातील सर्वांत मोठा एअरो इंडिया एक्स्पो आहे़ नऊ देशांचे संरक्षणमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत़ याशिवाय देश-विदेशातील वरिष्ठ अधिकारी आणि शेकडो उद्योगपती यात सहभागी झाले आहेत़
अनेक देशांचे ५४ मंत्रिस्तरीय आणि अन्य उच्चस्तरीय शिष्टमंडळांसह ६०० पेक्षा अधिक कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत़ यात २९५ भारतीय आणि ३२८ विदेशी कंपन्यांचा समावेश आहे़ अमेरिकेच्या सर्वाधिक ६४ कंपन्यांनी यात भाग घेतला आहे़ यासंदर्भात फ्रान्स दुसऱ्या क्रमाकांवर आहे़ फ्रान्सच्या ४८, रशियाच्या ४१, इस्रायलच्या २५ आणि जर्मनीच्या १७ कंपन्या एअर शो एक्स्पोमध्ये सहभागी आहेत़
अन्य देशांकडून संरक्षण उपकरणे आयात करण्यावर भारत हजारो अब्ज डॉलर्स खर्च करतो़ ही आयात घटवून देशातील संरक्षण उद्योगांना लक्ष्य करणे हे आता भारताचे लक्ष्य आहे़ सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाचा हाच मुख्य केंद्रबिंदू आहे़-नरेंद्र मोदी, पंतप्रधान