विधानसभेत भाजपा आमदार बघत होते प्रियांका गांधींचा फोटो
By Admin | Updated: December 11, 2014 12:57 IST2014-12-11T12:49:30+5:302014-12-11T12:57:20+5:30
कर्नाटक विधानसभेत उसाच्या प्रश्नासंबंधी गंभीर चर्चा सुरू असताना भाजपाचे एक आमदार प्रियांका गांधी यांचा फोटो पाहताना पकडले गेले आहेत.

विधानसभेत भाजपा आमदार बघत होते प्रियांका गांधींचा फोटो
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. ११ - कर्नाटकमध्ये भाजपाला पुन्हा एकदा आपल्या आमदारांमुळे मान खाली घालावी लागली आहे. बुधवारी विधानसभेत उसाच्या प्रश्नासंबंधी गंभीर चर्चा सुरू असताना भाजपाचे एक आमदार मात्र प्रियांका गांधी यांचा फोटो पाहताना पकडले गेले आहेत. एका स्थानिक वृत्तवाहिनीवर आमदारांच्या या कृत्याचा हा व्हिडीओ प्रसारित झाला आहे.
कर्नाटकमधील औराद भागातील भाजपाचे आमदार प्रभू चव्हाण बुधवारी आपल्या स्मार्टफोन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची कन्या प्रियांका गांधी-वड्रा यांचे फोटा पाहताना टीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत. ज्यावेळी विधानसभेत उसाच्या दराच्या मुद्यावर गंभीर चर्चा सुरू होती तेव्हा चव्हाण यांचे लक्ष चर्चेकडे नव्हे तर त्यांच्या मोबाईलमध्ये होते. तर दुसरे एक आमदार यु. बी. बनकर हे मोबाईलवर कँडी क्रश हा गेम खेळण्यात व्यस्त होते. या व्हिडीओनंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. या संपूर्ण प्रकाराचा तपास करुन योग्य ती कारवाई केली जाईल, असे भाजपने स्पष्ट केले आहे. मात्र आपण फोटो बघत नव्हतो तर एक मेसेज वाचत होतो, असे स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिले आहे. एक मेसेज वाचण्यासाटी मी माझा मोबाईल सुरू केला. त्यानंतर मी माझे कुटुंबिय, नरेंद्र मोदी व बाबा रामदेव यांचे फोटो बघत होतो. त्याचवेळी मला प्रियांका गांधी यांचा एक फोटो दिसला. त्याच्याखाली काहीतरी लिहीलेले दिसत होते, मात्र ते वाचता येत नसल्याने मी फोट झूम केला, सारवासरव चव्हाण यांनी केली.
यापूर्वी कर्नाटक विधानसभेत भाजपचे दोन मंत्री मोबाईल फोनवर अश्लिल व्हिडीओ पाहताना सापडले होते.