लखनऊ: काँग्रेसच्या महासचिवपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर आज प्रियंका गांधी लखनऊमध्ये दाखल झाल्या. प्रियंका राजकारणात सक्रीय होत असल्याच्या निमित्तानं काँग्रेसनं राज्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. उत्तर प्रदेशात गलितगात्र अवस्थेत असलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देण्याची कामगिरी त्यांना पार पाडावी लागणार आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी प्रियंका यांच्या खांद्यावर आहे. समाजवादी पार्टी-बहुजन समाज पार्टीच्या महाआघाडीचा आणि सत्ताधारी भाजपाचा मुकाबला करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. 'बदलाव की गांधी, प्रियंका गांधी' अशा घोषणा रोड शो दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. याशिवाय लखनऊमध्ये प्रियंका आणि राहुल गांधींचे पोस्टरदेखील लावण्यात आले. प्रियंका यांच्या रोड शोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह खासदार ज्योतिरादित्य सिंधियादेखील उपस्थित आहेत. सिंधिया यांच्याकडे पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. या रोड शो दरम्यान राहुल यांनी पुन्हा एकदा राफेल विमान कराराचा मुद्दा उपस्थित केला. राहुल आणि प्रियंका बसमधून रोड शो करत आहेत. त्यावेळी त्यांच्या हातात राफेल विमानाचं कट आऊट पाहायला मिळालं. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर है अशी घोषणाबाजी केली. याशिवाय काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हातातही राफेलचं कटआऊट पाहायला मिळालं.
...अन् प्रियंका गांधींच्या रोड शोमध्ये दिसलं राफेल विमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 16:51 IST