पोलीस अत्याचार पीडित परिवारांना भेटल्या प्रियंका गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 06:17 IST2020-01-05T06:16:57+5:302020-01-05T06:17:08+5:30
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी शनिवारी सीएएविरोधी आंदोलनादरम्यान पोलीस अत्याचारांचा फटका बसलेल्या मुजफ्फरनगर व मेरठ येथील परिवारांची भेट घेतली.

पोलीस अत्याचार पीडित परिवारांना भेटल्या प्रियंका गांधी
मुजफ्फरनगर/मेरठ : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी शनिवारी सीएएविरोधी आंदोलनादरम्यान पोलीस अत्याचारांचा फटका बसलेल्या मुजफ्फरनगर व मेरठ येथील परिवारांची भेट घेतली. त्यासाठी त्यांनी मुजफ्फरनगरचा अनिरोजित दौरा केला. त्याआधी लखनौ आणि बिजनौर येथील पीडित कुटुंबियांना भेटणाऱ्या प्रियांका गांधी यांनी पत्रकारांना सांगितले की, पोलिसांनी लोकांचे संरक्षण करायचे असते, त्यांना न्याय द्यायचा असतो; पण येथे तर याच्या अगदी उलट घडले आहे. पोलिसांनीच लोकांवर अत्याचार केले आहेत.
मुजफ्फरनगरच्या अनियोजित दौºयात प्रियांका गांधी यांनी मौलाना असद रजा हुसैनी यांची भेट घेतली. सीएएविरोधी आंदोलनाचे निमित्त करून पोलिसांनी हुसैनी यांना बेदम मारहाण केली होती. प्रियांका गांधी यांनी सांगितले की, हुसैनी हे मदरशात मुलांसोबत असताना पोलिसांनी त्यांच्यावर हल्ला केला. उत्तर प्रदेश पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे.
आंदोलनादरम्यान हिंसाचारात मृत्युमुखी पडलेले नूर मोहंमद यांच्या परिवाराची प्रियांका गांधी यांनी भेट घेतली. रुकैया परवीन यांनाही त्या भेटल्या. पोलिसांनी परवीन यांचे घर तोडून फोडून टाकले होते.
प्रियांका गांधी यांनी म्हटले की, पोलिसांच्या अत्याचाराच्या प्रत्येक घटनेची माहिती मी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना मागील आठवड्यात भेटून दिली आहे. कारण नसताना पोलिसांनी नागरिकांवर कसे हल्ले केले याचा तपशील आपल्याकडे आहे. काही चुकीचे घडले असेल, तर पोलीस कारवाई करू शकतात; पण येथे पोलीस स्वत:च तोडफोड करीत आहेत.
शेजारील मेरठ जिल्ह्यातील पीडित परिवार शहराच्या सीमावर्ती भागात एकत्र आले होते. तेथे प्रियांका यांनी त्यांची भेट घेतली. २४ डिसेंबर रोजी त्यांना आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी मेरठला जाण्यापासून रोखले होते.
>नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करताना मेरठमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांची काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी मेरठमध्ये भेट घेऊन विचारपूस केली.