Coronavirus: पुन्हा बंद झालं रेल्वे गाड्यांचं आरक्षण; 30 एप्रिलपर्यंत धावणार नाहीत 'या' ट्रेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 17:04 IST2020-04-07T17:03:59+5:302020-04-07T17:04:40+5:30
आयआरसीटीसीनं येत्या १५ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान खासगी तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या ट्रेनच्या फेऱ्या रद्द केलेल्या आहेत. त्यामुळे या ट्रेनचं आरक्षण बंद करण्यात आलं असून, रेल्वेला या संबंधी सूचनाही पाठवण्यात आल्या आहेत.

Coronavirus: पुन्हा बंद झालं रेल्वे गाड्यांचं आरक्षण; 30 एप्रिलपर्यंत धावणार नाहीत 'या' ट्रेन
नवी दिल्लीः कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खासगी तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या ट्रेन्सचं बुकिंग पुन्हा एकदा बंद करण्यात आलं आहे. आता या ट्रेनचं १ मे २०२०पासून पुढचं आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आयआरसीटीसीनं येत्या १५ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान खासगी तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या ट्रेनच्या फेऱ्या रद्द केलेल्या आहेत. त्यामुळे या ट्रेनचं आरक्षण बंद करण्यात आलं असून, रेल्वेला या संबंधी सूचनाही पाठवण्यात आल्या आहेत.
प्रवासी तिकीट बुक करत नाहीत
रेल्वे अधिका-याच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊननंतर धावणाऱ्या ट्रेनचं आरक्षण उघडलल्यानंतर लोकप्रिय रेल्वे गाड्यांचं अनेकांनी आरक्षण केलं. पण खासगी तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या ट्रेनमध्ये बुकिंग खूप कमी होते. एका दिवसात दीड ते दोनशे प्रवाशांनी बुकिंग केलेलं असून, एवढ्या प्रवाशांसाठी संपूर्ण रेल्वे चालवणे अवघड आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापर्यंत या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 1 मेपासून बुकिंग खुले करण्यात आले आहे.
आरक्षण रद्द झाल्यास परतावा दिला जाणार
अधिकारी म्हणाले की, ज्यांनी तेजस एक्स्प्रेसमध्ये 15 ते 30 एप्रिल 2020 दरम्यान आरक्षण केलं होतं, त्यांना परतावा देण्यात येईल.
सर्व गाड्यांची सेवा २१ दिवसांसाठी खंडित
पंतप्रधानांनी २४ मार्चला लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर रेल्वेने १३५२३ गाड्यांच्या सेवा २१ दिवसांसाठी स्थगित केल्या आहेत. यामुळे खासगी गाड्यांचे कामकाजही ठप्प झाले आहे.
देशात IRCTC दोन खासगी गाड्या चालवते
सध्या आयआरसीटीसीही प्रायोगिक तत्त्वावर तेजस एक्स्प्रेस गाडी चालवते. दिल्ली ते लखनौ आणि अहमदाबाद ते मुंबई या मार्गांवर IRCTCच्या खासगी तत्त्वावरील गाड्या धावतात.