महिलेवर बलात्कार आणि अश्लील व्हिडीओ प्रकरणी भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला बंगळुरूमधील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने त्याला भारतीय दंडविधानातील विविध कलमांखाली दोषी ठरवले. तसेच त्याच्यावर दंडात्मक कारवाईही केली आहे. दरम्यान, जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर प्रज्वल रेवण्णा याला परप्पना अग्रहारा तुरुंगातील कैद्यांच्या बराकीत पाठवण्यात आले आहे. तसेच आता रेवण्णा याच्या तुरुंगातील दिनक्रम समोर आला आहे.
माजी पंतप्रधानांचा नातू, माजी मुख्यमंत्र्यांचा पुतण्या आणि स्वत: माजी खासदार असलेल्या प्रज्वल रेवण्णा याला आता तुरुंगामध्ये कैदी क्रमांक १५ हजार ५२८ ही नवी ओळख मिळाली आहे. तसेच त्याला कैद्यांसाठीचा गणवेश असलेले पांढरे कपडे देण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रज्वल रेवण्णा याचा तुरुंगातील पहिला दिवस खूप अस्वस्थतेत गेला. तसेच तो पूर्ण रात्रभर झोपू शकला नाही.
३ ऑगस्ट रोजी सकाळी प्रज्वल रेवण्णा याचा दिनक्रम हा इतर कैद्यांप्रमाणेच होता. नित्यकर्म आटोपल्यानंतर तो शांतपणे बसून होता. तुरुंग प्रशासनाने त्याला नाश्त्यामध्ये अवलक्की नावाचा पदार्थ दिला. हा पदार्थ सुक्या पोह्यांप्रमाणे असतो. तसेच कैद्यांना बहुतांश हाच पदार्थ नाश्त्यामध्ये देता येतो.
आता प्रज्वल रेवण्णा याला दररोज तुरुंगामध्ये आठ तास काम करावं लागेल. तसेच तुरुंगातील नियमानुसार त्याला विविध कामांपैकी एका कामाची निवड करावी लागेल. सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रज्वल रेवण्णा याला अकुशल कामगार मानलं जाईल. तसेच त्याच्या बदल्यात त्याला दरमहा केवळ ५२४ रुपये एवढं वेतन मिळेल. जर त्यानं चांगलं काम केलं तर त्यााल अर्धकुशल आणि नंतर कुशल कैद्याच्या श्रेणीत पदोन्नत केलं जाईल. तसेच त्याच्या वेतनामध्येही वाढ होईल.
दरम्यान, कोर्टाने प्रज्वल रेवण्णा याला शिक्षा सुनावताना ११ लाख ६० हजार रुपये एवढा दंडही ठोठावला आहे. दंडाच्या या रकमेपैकी ११ लाख २५ हजार रुपये हे पीडित महिलेला दिले जातील.