सुधारणांची गती कायम ठेवणार - पंतप्रधानांची ग्वाही
By Admin | Updated: January 17, 2015 03:37 IST2015-01-17T03:37:04+5:302015-01-17T03:37:04+5:30
देशात सकारात्मक नियमन संरचना, कर व्यवस्थेत स्थैर्य आणि पायाभूत क्षेत्राला प्रोत्साहन देत सुधारणांच्या अत्युच्य वेगवान गतीसह वाटचाल

सुधारणांची गती कायम ठेवणार - पंतप्रधानांची ग्वाही
नवी दिल्ली : देशात सकारात्मक नियमन संरचना, कर व्यवस्थेत स्थैर्य आणि पायाभूत क्षेत्राला प्रोत्साहन देत सुधारणांच्या अत्युच्य वेगवान गतीसह वाटचाल करताना देशाची अर्थव्यवस्था सध्याच्या २ हजार अब्ज डॉलरवरून २० हजार अब्ज डॉलरवर नेण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. सध्या गॅस सिलिंडरसाठी असलेली रोख हस्तांतरण योजना (डीसीटी) अन्य योजनांसाठी लागू करण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. विकासाचा परिणाम रोजगारांच्या संधींच्या रूपाने दिसायला हवा. नियमांत बदल करीत करव्यवस्थेत सुधारणा घडवून आणल्या जातील. गरजूंना डोळ्यासमोर ठेवून सबसिडी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आम्ही गुंतवणुकीच्या मार्गांत येणाऱ्या विविध अडचणी दूर करीत आहोत. कर व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणांची गरज आहे. त्या दिशेने पुढाकार घेण्यात आला आहे. मी वेगावर विश्वास ठेवतो. झपाट्याने व्यापक बदल आणायचे असून येत्या काळांत तुम्ही त्याची प्रशंसा कराल, असे ते अर्थव्यवस्थेवरील परिषदेत म्हणाले. प्रशासकीय कामात सुधारणा ही निरंतर प्रक्रिया आहे. काळाला अनुसरून नियम आणि प्रक्रिया नसतील तेथे बदल करण्यावर सरकार भर देत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये विकासदर पाच टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे. घोटाळ्यावर घोटाळे समोर आले. आता नव्या युगाच्या भारताचा उदय होत आहे.