पंतप्रधान देणार सियाचीनला भेट?
By Admin | Updated: August 11, 2014 01:08 IST2014-08-11T01:08:26+5:302014-08-11T01:08:26+5:30
येत्या १२ जुलैला काश्मीरच्या लडाख येथील लेह जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सियाचीन हिमनदीला (ग्लेशियर) भेट देऊ शकतात़

पंतप्रधान देणार सियाचीनला भेट?
नवी दिल्ली : येत्या १२ जुलैला काश्मीरच्या लडाख येथील लेह जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सियाचीन हिमनदीला (ग्लेशियर) भेट देऊ शकतात़
सियाचीन हे जगातील सर्वात उंच युद्धतळ आहे़ माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी २००५ मध्ये सियाचीनचा दौरा केला होता आणि हे क्षेत्र शांती पर्वत म्हणून नावारूपास आणण्याची इच्छा व्यक्त केली होती़
लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लेह आणि कारगील जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान मंगळवारी पंतप्रधान सियाचीनला भेट देऊ शकतात़ लडाखमध्ये ते एका वीज प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत़ लष्करप्रमुख दलवीर सिंह सुहाग हेही यावेळी हजर राहणार आहेत़ यावेळी पंतप्रधान लष्करी जवानांशीही चर्चा करणार आहेत़
सुमारे २२ हजार फुट उंचीवरील सियाचीन हिमनदीच्या परिसरात सुमारे ३००० भारतीय जवान तळ ठोकून आहेत़ शून्यापेक्षाही कमी तापमान असलेल्या या क्षेत्रात प्रतिकूल हवामानामुळे जवानांना प्रसंगी प्राणही गमवावे लागतात़ येथील बहुतांश लष्करी चौक्या १६ हजार फूट उंचीवर स्थित आहे़
बाना चौकी २२ हजार फूट उंचीवर आहे़ या परिसरातून एकाचवेळी पाकिस्तान आणि चीन दोन्ही देशांवर लक्ष ठेवणे शक्य होत असल्यामुळे भारतीय जवानांच्या प्राणांचे जबर मोल देऊनही भारतीय लष्कर सियाचीन ठाणी सोडण्यास तयार नाहीत़
तथापि हा भाग सैन्यमुक्त करण्याची पाकिस्तानची मागणी आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)