पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नियम फक्त मंत्र्यांनाच ?
By Admin | Updated: June 21, 2014 12:42 IST2014-06-21T11:00:27+5:302014-06-21T12:42:48+5:30
मंत्र्यांसाठी नियमावली तयार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे नियम बहुधा फक्त मंत्र्यांसाठीच लागू केले असून त्यांनी स्वतःला मात्र या नियमांमधून वगळल्याचे दिसते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नियम फक्त मंत्र्यांनाच ?
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २१- मंत्र्यांसाठी नियमावली तयार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे नियम बहुधा फक्त मंत्र्यांसाठीच लागू केले असून त्यांनी स्वतःला मात्र या नियमांमधून वगळल्याचे दिसते. पंतप्रधान मोदींनी आता यूपीए सरकारच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालय निदेशक म्हणून काम करणा-या राजीव टोपनो यांची खासगी सचिव म्हणून नेमणूक केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मंत्र्यांसाठी लांबलचक नियमावलीच बनवली आहे. मंत्र्यांनी युपीए सरकारमधील मंत्र्यांचे खासगी सचिव किंवा पर्सनल स्टाफमध्ये असलेल्या सरकारी अधिका-यांना स्वतःचे खासगी सचिव किंवा पर्सनल स्टाफमध्ये नेमू नये असे तोंडी पंतप्रधानांनी दिले होते. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयातर्फे सर्व मंत्र्यांना नुकतेच एक पत्रक पाठवून लेखी आदेश देण्यात आले आहे. मात्र मोदींनी स्वतःला मात्र या नियमापासून मुक्त ठेवल्याचे दिसते.
मोदींनी गुजरात आयएएस कॅडरचे अधिकारी राजीव टोपनो यांची खासगी सचिव म्हणून नेमणूक केली आहे. विशेष म्हणजे टोपने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयाचे निर्देशक म्हणून कार्यरत होते. मात्र तरीदेखील मोदींनी टोपनो यांची नेमणूक केल्याने आश्चर्य व्यक्त होते. मोदींनी यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, गृहराज्यमंत्री किरण रिजीजू आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांच्या खासगी सचिवांच्या नेमणूकीला विरोध दर्शवला होता.
राजनाथ सिंह यांना आयपीएस अधिकारी आलोक सिंह हे खासगी सचिव म्हणून हवे होते. आलोक सिंह लवकरच खासगी सचिव पदाचा कार्यभारही स्वीकारणार होते. मात्र आलोक सिंह हे यूपीए सरकारमधील परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांचे खासगी सचिव होते. त्यामुळे मोदींनी आलोक सिंह याची नेमणूक रद्द केली होती.