राजकीय घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची कडाडून टीका, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 09:25 AM2022-07-04T09:25:04+5:302022-07-04T09:25:30+5:30

दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या पक्षांची झाली अधोगती, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे तेलंगणातील हैदराबाद येथे आयोजन करण्यात आले होते

Prime Minister Narendra Modi's criticism on political dynasty | राजकीय घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची कडाडून टीका, म्हणाले...

राजकीय घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची कडाडून टीका, म्हणाले...

Next

हैदराबाद : देशावर दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या पक्षांची आता अधोगती झाली आहे. त्याबद्दल त्या पक्षांची थट्टा करू नये तर या पक्षांनी केलेल्या चुकांपासून आपण धडा घेतला पाहिजे, असे मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. लांगूलचालन, घराणेशाहीला देशातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे घराणेशाहीवर चालणाऱ्या पक्षांचे अस्तित्व यापुढे प्रदीर्घ काळ टिकणे अशक्य आहे, अशी टीका मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे तेलंगणातील हैदराबाद येथे आयोजन करण्यात आले होते. तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधात प्रादेशिक पक्षांची आघाडी उभारण्याच्या प्रयत्नात असताना, त्यांच्याच राज्यात भाजपने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक  आयोजित केली. दक्षिण भारतातील तेलंगणासह इतर राज्यांवर आपले यापुढे अधिक लक्ष असेल, असे या बैठकीतून भाजपने दाखवून दिले आहे.

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताला जगात श्रेष्ठ बनविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. विरोधी पक्ष लांगूलचालनाचे राजकारण करतात. समाजातील सर्व घटकांचे कल्याण साधून भाजप कार्यकर्त्यांनी या राजकारणाला प्रत्युत्तर दिले पाहिजे.

हैदराबादला म्हणाले भाग्यनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर असा केला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकसंध भारताचा पाया रचला. आता श्रेष्ठ (महान) भारत घडविण्याची कामगिरी भाजपला पार पाडायची आहे.

तेलंगणामध्ये डबल इंजिनचे सरकार सत्तेत आणा : मोदी
तेलंगणात डबल इंजिनचे सरकार सत्तेत आल्यास या राज्याचा आणखी प्रचंड विकास होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील जाहीर सभेत रविवारी सांगितले. ते म्हणाले की, २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत तेलंगणामध्ये भाजपने जितके यश मिळविले त्यामध्ये त्यानंतरच्या कालावधीत आणखी वाढ झाली आहे.  राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपानंतर मोदी यांची हैदराबादमध्ये जाहीर सभा झाली. 

आगामी विधानसभा निवडणुकीत तेलंगणात भाजपला जनतेने विजयी करावे. राज्य व केंद्रात डबल इंजिनचे सरकार असावे, असा जनतेने कौल द्यावा. डबल इंजिन सरकारमुळे तेलंगणातील शहरी, ग्रामीण भागाचा झपाट्याने विकास होईल. ‘सबका साथ, सबका विकास’ हा आमचा मूलमंत्र आहे. त्यानुसार आम्ही तेलंगणाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. केंद्र सरकारच्या योजनांचा मोठा लाभ तेलंगणातील जनतेला मिळत आहे, असेही मोदी म्हणाले.

‘केसीआर सरकार घराणेशाही, भ्रष्ट राजकारणाचे प्रतीक’
तेलंगणामधील के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांचे सरकार हे घराणेशाही, भ्रष्ट राजकारणाचे प्रतीक बनले आहे अशी टीका करणारा एक प्रस्ताव भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या हैदराबाद येथे भरलेल्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, तेलंगणातील जनतेेसमोर असलेल्या सामाजिक, आर्थिक समस्यांमध्ये सतत वाढ होत आहे. केसीआर यांच्या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. केसीआर व एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे दोघे मिळून तेलंगणाला लुटत आहेत असा आरोप केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी केला आहे.

Web Title: Prime Minister Narendra Modi's criticism on political dynasty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.