पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आज पहिल्यांदाच एकत्र बैठक करणार; निर्णयाकडे देशभराचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 12:39 IST2025-02-17T12:39:09+5:302025-02-17T12:39:39+5:30
नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी आणि एक केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आज पहिल्यांदाच एकत्र बैठक करणार; निर्णयाकडे देशभराचे लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी एकत्र बैठक घेणार आहेत. आज दिल्लीत दोन्ही नेत्यांची एका मंत्र्यांसह महत्वाची बैठक होत आहे. या हाय लेव्हल बैठकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. या बैठकीला कारण म्हणजे नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड हे आहे.
नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी आणि एक केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नवीन मुख्य निव़डणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी आलेल्या उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार आहे. या बैठकीला केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन मेघवाल उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या निवड समितीमध्ये पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशही होते. परंतू, काही वर्षांपूर्वी यामध्ये बदल करण्यात आले. तेव्हा राहुल गांधी यांनी या बदलाला विरोध केला होता. आता या तिघांच्या सहमतीने किंवा २:१ अशा सहमतीने मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड केली जाणार आहे.
राहुल गांधींचा विरोध कशाला...
सरकारचे दोन प्रतिनिधी आणि विरोधकांचा एक असेल तर कोणत्याही परिस्थितीत सरकारला हवे त्याचेच नाव निवडले जाणार आहे. तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवरून काही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. हे दोन्ही मुद्दे राहुल यांनी मांडत या निवडीच्या प्रक्रियेला विरोध केला आहे. या जनहित याचिकेत सरन्यायाधीशांना समितीत सहभागी न करण्याच्या विरोधातही याचिका आहे, या सर्व याचिकांवर १९ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
सध्याचे सीईसी राजीव कुमार हे १८ फेब्रुवारीला निवृत्त होत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा २०२३ मध्ये लागू करण्यात आला आहे. यानुसार ही पहिली मुख्य आयुक्तांची निवड असणार आहे. मार्च २०२४ मध्ये एसएस संधू आणि ज्ञानेश कुमार यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.