पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग राष्ट्राला उद्देशून भाषण करणार नाही?
By Admin | Updated: May 12, 2014 00:08 IST2014-05-11T19:47:33+5:302014-05-12T00:08:08+5:30
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग राष्ट्राला उद्देशून भाषण करणार नाही?

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग राष्ट्राला उद्देशून भाषण करणार नाही?
हरीश गुप्ता/नवी दिल्ली : तिसरी आघाडी स्थापन करून किंवा तिसर्या आघाडीला पाठिंबा देऊन सरकारमध्ये कायम राहू, अशी आशा काँग्रेसला असली तरी सरकारी पातळीवर मात्र सामान बांधण्याची लगबग सुरू झाली आहे.
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आपण पुन्हा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसेन, असे आधीच स्पष्ट केले आहे. ते १७ मे रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर ते ७ रेसकोर्स हे पंतप्रधानांचे शासकीय निवासस्थान सोडणार आहेत. हे बघता अनेक मंत्र्यांनी आपल्या कार्यालयातील फाईल्सचा निपटारा केला आहे.
राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारल्यानंतर डॉ. सिंग हे ३, मोतीलाल नेहरू मार्गावरील नवीन घरात राहायला जातील. डॉ. सिंग यांनी सलग दोनदा सरकारचे नेतृत्व केले आहे. त्या पार्श्वभूमीवर याआधी आलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग राजीनामा देण्यापूर्वी राष्ट्राला उद्देशून भाषण करणार होते. परंतु डॉ. सिंग यांना त्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे हे भाषण होण्याची शक्यता कमी आहे. परंतु पंतप्रधान डॉ. सिंग यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण करावे, असे पंतप्रधान कार्यालयाला वाटते.
सिंग यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री फाईल्सचा निपटारा करीत आहेत. लोकसभा निवडणूक लढत नसलेले अर्थमंत्री पी. चिदंबरम हे देखील फाईल्सचा निपटारा करीत आहेत. नॉर्थ ब्लॉकमध्ये १८ मे रोजी औपचारिक हस्तांदोलन कार्यक्रम होईल. त्यानंतर चिदंबरम पुन्हा आपल्या वकिलीच्या व्यवसायात परतील.
भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी पुढे येण्यास पी. चिदंबरम हे जबाबदार असल्याचे अनेक काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे. चिदंबरम यांच्याकडील आयकर विभागाने नितीन गडकरी यांच्या परिसरात धाडी टाकल्या नसत्या, तर गडकरी यांची भाजपाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली असती. गडकरी यांच्या जाण्याने राजनाथसिंग आणि नरेंद्र मोदी यांना उभारी मिळाली.
आंध्र प्रदेशातून आलेले केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांनी फाईल्सचा निपटारा करण्याचे आदेश आपल्या कर्मचार्यांना दिले आहेत. ते १७ मे रोजी राजधानीत परत येण्याची शक्यता आहे.
ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी शुक्रवारी कृषी भवनातील आपली चेम्बर खाली केली. ते राज्यसभा सदस्य असल्याने त्यांना शासकीय निवास सोडण्याची आवश्यकता नाही.
संपुआ-२ सरकारमधील काही मंत्र्यांनी शासकीय कार परत केली आहे; तसेच सामान बांधण्याची लगबग सुरू आहे.