घोटाळ्यातून नावे वगळण्यासाठी दबाव
By Admin | Updated: August 25, 2014 03:42 IST2014-08-25T03:42:16+5:302014-08-25T03:42:16+5:30
राष्ट्रकुल स्पर्धा अणि कोळसा खाणपट्टे वाटप घोटाळ्यातील काही नावे कॅगच्या अहवालातून वगळण्यासाठी संपुआ सरकारमधील काही नेत्यांनी आपल्यावर दबाब टाकला होता

घोटाळ्यातून नावे वगळण्यासाठी दबाव
नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धा अणि कोळसा खाणपट्टे वाटप घोटाळ्यातील काही नावे कॅगच्या अहवालातून वगळण्यासाठी संपुआ सरकारमधील काही नेत्यांनी आपल्यावर दबाब टाकला होता, असा खळबळजनक आरोप करणाऱ्या माजी महालेखा परीक्षक व नियंत्रक (कॅग) विनोद राय यांच्यावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. निवृत्तीनंतर सनसनाटी निर्माण करणारे लेखन करून प्रकाशझोतात राहण्याच्या वृत्तीवरही काँग्रेसने बोट ठेवले आहे.
राय यांचे ‘नॉट जस्ट अॅन अकाउंटंट’ हे पुस्तक १५ सप्टेंबरला प्रकाशित होणार आहे. त्यात त्यांनी सरकारने टाकलेल्या दबावाचे विवेचन केले आहे. राय गेल्या वर्षी पदमुक्त झाले होते. त्यांनी आपल्या अहवालात २ जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात १.७६ लाख कोटी रुपये आणि कोळसा खाणपट्टे वाटप घोटाळ्यात १.८६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले होते. राय यांनी एका वृत्तवाहिनीसोबत आपल्या पुस्तकाबद्दल बोलताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरही निशाणा साधला. संपुआच्या पदाधिकाऱ्यांनी नावे वगळण्यासाठी काही आयएएस सहकाऱ्यांना माझी मनधरणी करण्याची गळ घातली होती, असा दावाही राय यांनी केला. यापूर्वी माजी पंतप्रधानांचे मीडिया सल्लागार संजय बारू, माजी परराष्ट्र मंत्री के. नटवरसिंग आणि माजी कोळसा सचिव पी.सी. पारख यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या सरकारवर गंभीर आरोप केले होते. सिंग यांनी पदावर टिकून राहण्यासाठी सरकारचे आर्थिक नुकसान करणारे निर्णय घेतले. याविषयी आपण पुस्तकात सविस्तर माहिती देणार आहोत, असे राय म्हणाले. आघाडीच्या राजकीय अपरिहार्यतेपोटी गव्हर्नन्सचा बळी दिला जाऊ शकत नाही हे पुस्तकात म्हटले आहे, असे राय म्हणाले. राय यांनी रविवारी भेटावयास गेलेल्या वार्ताहरांना भेटण्यास नकार दिला आणि प्रतिक्रिया दिली नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)