सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक दाखवण्यासाठी डॉक्टरांवर दबाव
By Admin | Updated: July 2, 2014 10:29 IST2014-07-02T09:32:54+5:302014-07-02T10:29:03+5:30
सुनंदा पुष्कर यांचा शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव येत होता असा गौप्यस्फोट दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे डॉ. सुधीर गुप्ता यांनी केला आहे.

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक दाखवण्यासाठी डॉक्टरांवर दबाव
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २ - माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणाने बुधवारी नवे वळण घेतले आहे. पुष्कर यांचा शवविच्छेदन अहवाल (पोस्टमार्टम रिपोर्ट) बदलण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव येत होता असा गौप्यस्फोट दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे डॉ. सुधीर गुप्ता यांनी केला आहे. गुप्ता हे एम्सच्या फॉरेंसिक विभागाचे प्रमुख आहेत.
१७ जानेवारी रोजी दिल्लीतील लीला या पंचतारांकित हॉटेलमधील एका रुममध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला पुष्कर यांच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त केला गेला. शवविच्छेदन अहवालात पुष्कर यांचा मृत्यू अनैसर्गिक अन् आकस्मिक असल्याचे म्हटले होते. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मात्र आता सात महिन्यांनी या प्रकरणाने पुन्हा नवीन वळण घेतले आहे.
पुष्कर यांच्या पार्थिवाचे पोस्टमार्टम करणारे फॉरेंसिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर कुमार गुप्ता यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. तत्कालीन आरोग्य मंत्री गुलाम नवी आझाद यांनी पुष्कर यांचा मृत्यू 'नैसर्गिक' दाखवण्यासाठी दबाव आणला होता. हे प्रकरण गुंडाळण्यासाठी त्यांनी व एम्समधील वरिष्ठ अधिका-यांनी अथक प्रयत्न केले. थरुर आणि आझाद हे दोघेही राजकारणातील वजनदार व्यक्ती असल्याने त्यावेळी उघडपणे बाजू मांडता आली नाही असे डॉ. गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे, पुष्कर यांचा मृत्यू आत्महत्या किंवा हत्या असू शकतो असे गुप्ता यांचे म्हणणे आहे. भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान, डॉ. गुप्ता यांना डावलून अन्य डॉक्टराला बढती देण्यात आली आहे. संबंधित डॉक्टरऐवजी या पदावर आपण पात्र आहोत असा दावाही गुप्ता यांनी पत्रात केला आहे. पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणात मी दबावासमोर झुकण्यास नकार दिल्याने आता मला टार्गेट केले जात आहे असा आरोपही गुप्ता यांनी केला आहे.