प्रजासत्ताक दिनासाठी सर्वात मोठ्या मुस्लिम देशाच्या राष्ट्रपतींना निमंत्रण; पाकिस्तानलाही जाण्याच्या चर्चेने पेच फसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:20 IST2025-01-10T14:18:44+5:302025-01-10T14:20:50+5:30
इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबावो सुबियांतो हे प्रजासत्ताक दिनादिवशी भारतात येणार आहेत. पण अद्याप घोषणा झालेली नाही, कारण...

प्रजासत्ताक दिनासाठी सर्वात मोठ्या मुस्लिम देशाच्या राष्ट्रपतींना निमंत्रण; पाकिस्तानलाही जाण्याच्या चर्चेने पेच फसला
येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम देशाचे राष्ट्रपती भारतात प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. परंतू, त्यांच्या येण्यापुर्वीच पाकिस्तानने ते आपल्याकडेही येणार आहेत, असे दावे केल्याने हा दौरा वादात सापडण्याची चिन्हे आहेत.
इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबावो सुबियांतो हे प्रजासत्ताक दिनादिवशी भारतात येणार आहेत. ही काही त्यांची पहिलीच वेळ नाहीय, यापूर्वीही इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. परंतू. यावेळचा पेच जरा वेगळा आहे. भारत-पाकिस्तानचे ताणलेले संबंध सर्व जगाला माहिती आहेत. पाकिस्तानी मीडियाने सुबियांतो हे २६ जानेवारीला पाकिस्तानातही जाणार असल्याचा दावा केला आहे.
भारत दौऱ्यावर असताना सुबियांतो यांनी त्यात पाकिस्तानचाही दौरा करावा अशी भारताची इच्छा नाहीय. यामुळे सुबियांतो यांच्या भारत दौऱ्याची घोषणा करण्यात आलेली नाही. पाकिस्तानी मीडियानुसार सुबियांतो तीन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहेत, असे म्हटले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारताने अलिकडच्या काळात परदेशी नेत्यांना भारत आणि पाकिस्तानशी असलेले संबंध वेगळे ठेवण्याचे आणि त्यांच्या भारत भेटीदरम्यान पाकिस्तानला त्यांच्या भेटीचा भाग बनवू नये असे आवाहन केले आहे. भारताने इंडोनेशियाकडे राजनैतिकदृष्ट्या हा मुद्दा उपस्थित केला आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या समारंभानंतर सुबियांतो थेट पाकिस्तानला जाणार नाहीत अशी आशा व्यक्त केली आहे.
परेडनंतर इतक्या लवकर इस्लामाबादला भेट देणे भारतासाठी नकारात्मक संकेत देऊ शकते. डिसेंबरमध्ये इजिप्तमध्ये झालेल्या बहुपक्षीय कार्यक्रमादरम्यान, सुबियांतो यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य वाढवण्याबद्दल चर्चा केली होती. याचाच भाग म्हणून सुबियांतो पाकिस्तानला जाऊ शकतात, असे म्हटले जात आहे.