राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:18 IST2025-10-29T12:17:47+5:302025-10-29T12:18:55+5:30
Draupadi Murmu: फायटर जेट सूट परिधान करून अंबाला येथे घेतली ऐतिहासिक भरारी; महिला वैमानिकाने केले विमानाचे संचालन; हवाई दलाकडून गार्ड ऑफ ऑनर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
अंबाला : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज, बुधवारी हरियाणामधील अंबाला हवाई दलाच्या तळावरून राफेल या अत्याधुनिक लढाऊ विमानातून ऐतिहासिक भरारी घेतली. राष्ट्रपती म्हणून त्यांचा हा पहिलाच अनुभव होता आणि या निमित्ताने त्यांनी फायटर पायलटचा विशेष सूट परिधान केला होता.
अंबाला येथे पोहोचल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांना जवानांनी गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यानंतर त्यांनी राफेल विमानात बसून सुमारे २० मिनिटांची हवाई सफर केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रपतींनी ज्या विमानातून उड्डाण केले, त्याचे संचालन एका महिला वैमानिकाने केले.
प्रतिभाताईंच्या परंपरेचे अनुकरण...
यापूर्वी, २००९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांनी सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानातून उड्डाण करून इतिहास रचला होता. जेपीजे अब्दुल कलाम यांनी देखील लढाऊ विमानातून सफर केली होती. आता द्रौपदी मुर्मू यांनी राफेलमधून उड्डाण करून ही परंपरा पुढे नेली आहे. या ऐतिहासिक क्षणी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी आणि अन्य वरिष्ठ संरक्षण अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपतींनी 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये सहभागी असलेल्या जवानांचाही यावेळी सन्मान केला.
राष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे अंबाला हवाई दल स्टेशनवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.