From Presenting Dream Budget To Be Inmate Of Tihar Jail P Chidambaram Faces Toughest Test Of Career | एकेकाळी पंतप्रधान पदाचे दावेदार होते चिदंबरम, आज तिहार तुरुंगात
एकेकाळी पंतप्रधान पदाचे दावेदार होते चिदंबरम, आज तिहार तुरुंगात

नवी दिल्ली: एकेकाळी पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून ओळखले जाणारे आणि सामान्य जनतेच्या स्वप्नातील अर्थसंकल्प सादर करण्यासाठी लोकप्रिय असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी कधी कल्पना सुद्धा केली नसेल की त्यांना तिहार तुरुंगात जावे लागेल. 

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी पी. चिदंबरम यांची सीबीआय न्यायालयाने 19 सप्टेंबरपर्यंत तिहार तुरुंगात रवानगी केली आहे. पी. चिदंबरम यांना तिहार तुरुंगात वेस्टर्न टॉयलेट, टीव्ही, पुस्तकं, चश्मा आणि औषधेही देण्यात येणार आहे. पी. चिदंबरम यांना या सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे वकील कपिल सिब्बल यांना कोर्टात एक अर्ज दाखल केला होता. त्याला न्यायालयाने  मंजुरी देत पी. चिदंबरम यांना तुरुंगात सुरक्षा पुवण्याचे आदेश दिले आहेत आहेत.  

पी. चिदंबरम यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 22 ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले होते. तेव्हापासून ते सीबीआयच्या ताब्यात होते. आज त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान पी. चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी पी. चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी न देता सीबीआयच्याच कोठडीत ठेवावे, असा युक्तीवाद केला होता. मात्र, विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी सिब्बल यांचा हा युक्तीवाद फेटाळून लावत पी. चिदंबरम यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या तत्कालीन सरकारमध्ये पी. चिदंबरम यांनी अर्थमंत्रालयाची धुरा सांभाळली होती. त्यांनी 2004 ते 2008 पर्यंत अर्थमंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर 2008 ते जुलै 2012 पर्यंत केंद्रीय गृहमंत्री होते. काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना केंद्रात आघाडीचे सरकार बनवण्यासाठी पंतप्रधान पदाचे मजबूत दावेदार असल्याचे मानत होते. 
 


Web Title: From Presenting Dream Budget To Be Inmate Of Tihar Jail P Chidambaram Faces Toughest Test Of Career
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.