पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशातील सीमेवर लष्कर अलर्टवर आहेत. दरम्यान, आता ईराण या दोन्ही देशात शांतता राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची हे नवी दिल्ली भेटीपूर्वी सोमवारी इस्लामाबादच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर पाकिस्तानात जाणार आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अरघची यांची भेट आहे.
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान
मिळालेल्या माहितीनुसार, उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे अरघची पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी एक महत्त्वाची बैठक घेतील. त्यांची चर्चा पाकिस्तान आणि इराणमधील द्विपक्षीय संबंधांवर तसेच सध्याच्या प्रादेशिक परिस्थितीवर, विशेषतः अलीकडील पाकिस्तान-भारत तणावावर केंद्रित असणार आहे.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघेई यांनी शनिवारी देशाच्या सरकारी प्रेस टीव्हीला सांगितले की, परराष्ट्र मंत्री अराघची हे इराणच्या या प्रदेशातील देशांसोबत सुरू असलेल्या चर्चेचा भाग म्हणून पाकिस्तान आणि भारताला भेट देण्याची योजना आखत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी इराणने दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करण्याबाबत भाष्य केले होते.
अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार
बघेई म्हणाले की, पाकिस्तानमध्ये, अरघची उच्चपदस्थ पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. या चर्चेत द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर आणि प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवीनतम घडामोडींवर लक्ष केंद्रित केले जाईल.
इराणी राजदूत या आठवड्याच्या अखेरीस भारताला भेट देतील. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा हा दौरा होत आहे.