विलक्षण राजकीय प्रवास करणाऱ्या उमद्या काँग्रेस नेत्याचा अकाली अस्त

By अतुल कुलकर्णी | Published: August 23, 2018 02:11 AM2018-08-23T02:11:49+5:302018-08-23T02:13:34+5:30

गुरुदास कामत यांच्या अकाली जाण्याने मुंबई काँग्रेसची मोठी हानी झाली आहे

The premature departure of the Umayand Congress leader, who is a strange political traveler | विलक्षण राजकीय प्रवास करणाऱ्या उमद्या काँग्रेस नेत्याचा अकाली अस्त

विलक्षण राजकीय प्रवास करणाऱ्या उमद्या काँग्रेस नेत्याचा अकाली अस्त

Next

१९७६ मध्ये एनएसयूआयचे अध्यक्षपद, १९८० मध्ये महाराष्टÑ प्रदेश युथ काँग्रेसचे सरचिटणीसपद, १९८४ मध्ये महाराष्टÑ प्रदेश युथ काँग्रेसचे अध्यक्षपद, त्याच वर्षी पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर विजय, १९८७ मध्ये भारतीय युथ काँग्रेसचे अध्यक्षपद, पुढे सलग पाचवेळा काँग्रेसकडून लोकसभेवर प्रतिनिधित्व, २००३ मध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद, २००९ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात गृहखात्याचे राज्यमंत्रीपद असा १९७६ ते २०१४ पर्यंत तब्बल ३८ वर्षांचा विलक्षण प्रवास करणारे नेते गुरुदास कामत बुधवारी हे जग सोडून गेले.

मुंबईतला काँग्रेस पक्षाचा चेहरा. पत्रकार, विचारवंत, विविध क्षेत्रांतील नेते यांच्याशी कायम संबंध ठेवून असणारा हा नेता. त्यांच्या अकाली जाण्याने मुंबई काँग्रेसची मोठी हानी झाली आहे. पक्षाने त्यांना वर्षानुवर्षे भरभरून दिले. तरीही ते कायम वादग्रस्त राहिले. ‘गुरू’ नावाने पक्षात ओळख असणाºया या नेत्याचे पक्षात कधीच कोणत्या नेत्याशी पक्के सूर जुळले नाहीत. पक्षाशी निष्ठावान म्हणून काम करताना त्यांनी स्वत:चा असा गट तयार केला होता. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून ते २००८ साली बाजूला झाले. त्यानंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आलेल्या कृपाशंकर सिंह, जनार्दन चांदूरकर आणि संजय निरुपम यांच्याशी त्यांचे कधीही जमले नाही. आपल्यापेक्षा कोणीही जास्त शिकलेला किंवा जास्त संपर्क असणारा नेता त्यांना कधीही भावला नाही. सगळ्यांनी आपल्या धाकात आणि आपण म्हणतो तसेच राहावे हा त्यांचा हट्टी स्वभाव त्यांच्यासाठी कायम अडसर ठरला. केंद्रात गृहराज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर त्याचा वापर त्यांनी पक्षातल्याच नेत्यांचे राजकीय हिशेब पूर्ण करण्यासाठी केला. त्यातून त्यांच्याविषयी पक्षातही कटुता तयार झाली.
दिल्लीतील महत्त्वाची पदे मिळत असताना महाराष्टÑात विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या काळातही ते कायम चर्चेत राहिले. पक्षात वेगळा चेहरा समोर आणण्याची चर्चा सुरू झाली त्या वेळी त्यांचे नाव राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठीही चर्चेत आले. असे सगळे चांगले होत असताना त्यांच्यातल्या अतृप्त, अस्वस्थ राहण्याच्या वृत्तीने त्यांना कधीही गप्प बसू दिले नाही. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले संजय निरुपम असोत की कृपाशंकर सिंह त्यांच्याशी कामत यांचे कधीच जमले नाही. त्यातही निरुपम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास दाखवत पक्षाच्या सगळ्या पदांचे राजीनामे त्यांनी देऊन टाकले. स्वत: राहुल गांधी यांनी निरुपम आणि कामत यांच्यात समेट घडविण्याचे प्रयत्न केले, पण त्यातूनही काहीच निष्पन्न झाले नाही. याच काळात पक्षाने त्यांना गुजरातची जबाबदारी दिली; पण तेथेही त्यांचे कोणाशी पटले नाही. ती जबाबदारीही त्यांच्याकडून काढून घेतली गेली. राजस्थानची जबाबदारीही त्यांना पेलवली नाही.
कायम आपल्याच मनासारखे झाले पाहिजे, आपलेच ऐकले पाहिजे हा त्यांचा स्वभावगुण त्यांच्यासाठी अडसर ठरला. पक्षाने केंद्रात देऊ केलेले राज्यमंत्रीपद त्यांनी नाकारले आणि तेथेच त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. पक्षाने त्यांच्याकडे लक्ष देणे सोडून दिले. राहुल गांधी पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पक्षात फेरबदल सुरू केले, त्यात त्यांचा कोठेच समावेश होत नसल्याने स्वत:ची अस्वस्थता ते लपवू शकले नाहीत. त्यांच्या नजीकच्या पत्रकार मित्रांकडे ते ही खंत बोलूनही दाखवत होते. मात्र आता या सगळ्या जर-तरच्या गोष्टी उरल्या. कायम आपल्या गूढ चालींनी ते अनेकांना चकित करायचे. हा स्वभाव त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कायम ठेवला; आणि जातानाही ते सगळ्यांना चटका लावून गेले. त्यांच्या जाण्याने पक्षाने एक चांगला, अभ्यासू, सुसंस्कृत नेता गमावला आहे.

Web Title: The premature departure of the Umayand Congress leader, who is a strange political traveler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.