डेंग्यूच्या रुग्णाला सलाइनमधून 'मोसंबी ज्यूस' चढवलं, आता थेट हॉस्पीटलवर बुलडोझर चालवणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 16:35 IST2022-10-25T16:34:20+5:302022-10-25T16:35:39+5:30
डेंग्यूच्या रुग्णाला प्लेटलेट्सच्या जागी सलाइनमधून मोसंबी ज्यूस चढवल्याचा धक्कादायक प्रकार करणाऱ्या रुग्णालयाविरोधात आता प्रशासन कडक पाऊल उचलणार आहे.

डेंग्यूच्या रुग्णाला सलाइनमधून 'मोसंबी ज्यूस' चढवलं, आता थेट हॉस्पीटलवर बुलडोझर चालवणार!
प्रयागराज-
डेंग्यूच्या रुग्णाला प्लेटलेट्सच्या जागी सलाइनमधून मोसंबी ज्यूस चढवल्याचा धक्कादायक प्रकार करणाऱ्या रुग्णालयाविरोधात आता प्रशासन कडक पाऊल उचलणार आहे. संबंधित खासगी रुग्णालय जमीनदोस्त करण्याबाबतची नोटीस रुग्णालयाच्या प्रशासनाला पाठवण्यात आली आहे. प्रयागराज विकास प्राधिकरणाच्या चौकशीत संबंधित रुग्णालयाचा आराखडा मंजुर झालेला नव्हता असं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे आता या रुग्णालयावर देखील बुलडोजर चालवला जाणार आहे.
मंजुरी नसतानाही रुग्णालयाची इमारत उभारल्याच्या आरोपावर निर्धारित वेळेत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास प्रशासनाकडून धडक कारवाई केली जाणार आहे. यासाठीचं रुग्णालय प्रशासनाला अल्टीमेटम देखील देण्यात आला आहे. बिल्डिंगच्या मालकाला ३ दिवसांच्या आत उत्तर द्यावं लागणार आहे. या कालावधीच्या आत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कारवाई केली जाऊ शकते. प्रयागराज विकास प्राधिकरणाचे ओएसडी अभिनव रंजन यांनीही संबंधित रुग्णालयाला नोटीस धाडण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
प्रयागराजच्या झलवा परिसरात ग्लोबल रुग्णालय आहे. या रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णाला बनावट प्लेटलेट्स चढवले गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्लेटलेट्स चढवण्यात आल्यानंतर रुग्ण प्रदीप पांडे यांचा दोन दिवसांत मृत्यू झाला होता. प्लेटलेट्स ऐवजी मोसंबी ज्यूस सलाइनमधून चढवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनानं मोसंबी ज्यूस नव्हे, तर प्लाझ्मा चढवण्यात आल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी जप्त करण्यात आलेले नमुने तपासणी पाठवण्यात आले आहेत आणि याचा अहवाल अद्याप आलेला नाही.
लॅब रिपोर्टनंतरच प्लेटलेट्सच्या जागी रुग्णाला नेमकं काय चढवलं गेलं होतं याची माहिती स्पष्ट होऊ शकेल. रुग्णाला खरंच प्लाझ्मा चढवला गेला होता की मोसंबी ज्यूस याची माहिती अहवालातूनच स्पष्ट होईल. तोवर ग्लोबल हॉस्पीटल अँड ट्राम सेंटरला आरोग्य विभागानं २० ऑक्टोबरलाच सील केलं आहे. तसंच प्रयागराज पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी बनावट प्लेटलेट्स विकणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.