कार अपघातातून थोडक्यात बचावले प्रवीण तोगडिया, माझ्या हत्येचा कट असल्याचा केला आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 16:14 IST2018-03-07T16:08:13+5:302018-03-07T16:14:44+5:30
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांचा कारचा अपघात झाला आहे

कार अपघातातून थोडक्यात बचावले प्रवीण तोगडिया, माझ्या हत्येचा कट असल्याचा केला आरोप
सूरत - विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांचा कारचा अपघात झाला आहे. बुधवारी सुरतमध्ये हा अपघात झाला. कामरेज परिसरात तोगडिया यांच्या कारला पाठीमागून आलेल्या एका ट्रकने जोरदार धडक मारली. अपघातातून प्रवीण तोगडिया थोडक्यात बचावले आहेत. या अपघातामागे माझ्या हत्येचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रवीण तोगडिया यांनी म्हटलं आहे की, 'झेड प्लस सुरक्षा असतानाही पोलीस आपल्याला सुरक्षा पुरवत नाही आहेत'.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण तोगडिया यांच्या कारला मागून येणा-या ट्रकने जोरदार धडक दिली. पोलिसांना आपण जात असलेल्या मार्गाची आधीच माहिती देण्यात आली होती असं प्रवीण तोगडिया यांनी सांगितलं आहे. आपण राज्य सरकारकडे सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याची तक्रार करणार असल्याचंही ते बोलले आहेत. 'बुलेटप्रुफ कार नसती तर कोणीही जिवंत राहिले नसते', असा दावा प्रवीण तोगडिया यांनी केला आहे.
याआधीही प्रवीण तोगडिया यांनी हत्येची भीती व्यक्त केली होती. 15 जानेवारीला प्रवीण तोगडिया अहमदाबादमधून अचानक संशयितरित्या गायब झाले होते. यानंतर एका पार्कमध्ये बेशुद्द अवस्थेत ते सापडले होते. राजस्थान पोलीस आपला एन्काऊंटर करण्यासाठी येत असल्या कारणाने आपण गायब झालो असल्याचा दावा त्यांनी त्यावेळी केला होता.
काही दिवसांपुर्वी प्रवीण तोगडिया नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केल्याने चर्चेत आले होते. ज्याप्रकारे सरकार धार्मिक अल्पसंख्यांकांच्या शिक्षणाचा खर्च उचलत आहे, त्याप्रकारे त्यांनी हिंदूंची जबाबदारीही त्यांची आहे असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.