Prashant Kishore Arrested : प्रशांत किशोर यांना पोलिसांनी केली अटक; भल्या पहाटे BPSC आंदोलनात राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 09:28 IST2025-01-06T09:27:51+5:302025-01-06T09:28:32+5:30
Prashant Kishore Arrested : प्रशांत किशोर हे पाटण्यातील गांधी मैदानात आंदोलन करत होते.

Prashant Kishore Arrested : प्रशांत किशोर यांना पोलिसांनी केली अटक; भल्या पहाटे BPSC आंदोलनात राडा
Prashant Kishore Arrested : पाटणा : जनसुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, बिहार लोकसेवा आयोगाच्या (BPSC) परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात प्रशांत किशोर आंदोलन करत होते. प्रशांत किशोर हे पाटण्यातील गांधी मैदानात आंदोलन करत होते. यादरम्यान पोलिसांनी सोमवारी पहाटे पाच वाजता गांधी मैदान गाठून प्रशांत किशोर यांना आधी ताब्यात घेतले आणि पाटणा एम्समध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांना अटक केली आहे.
('लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रशांत किशोर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तेव्हा ते ब्लँकेट पांघरून झोपले होते. सध्या प्रशांत किशोर यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, गांधी मैदानाचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये पोलीस प्रशांत किशोर यांना घटनास्थळावरून हटवताना दिसत आहेत. यावेळी आंदोलक पोलिसांना रोखण्याचा प्रयत्नही करत होते. पोलिसांनी इतर आंदोलकांनाही ताब्यात घेतले आहे.
बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील कथित अनियमिततेच्या आरोपांमुळे प्रशांत किशोर यांनी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. तर, बिहार लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या ७० व्या संयुक्त (प्राथमिक) स्पर्धा परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
प्रशांत किशोर यांनी यापूर्वी 'पीटीआय'शी बोलताना म्हटले होते की, "हे नेते आमच्यापेक्षा खूप मोठे आहेत. गांधी मैदानात आपण पाच लाख लोक एकत्र करू शकतो. असे करण्याची हीच वेळ आहे. तरुणांचे भवितव्य पणाला लागले आहे. आम्ही एका क्रूर शासनाचा सामना करत आहोत, ज्याने केवळ तीन वर्षांत ८७ वेळा लाठीचार्जचा आदेश दिल आहे."
दरम्यान, बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात प्रशांत किशोर हे २ जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसले होते. यावेळी डॉक्टर त्यांची नियमित तपासणी करत होते. त्यांच्यावर उपचार न केल्यास त्यांची प्रकृती आणखी बिघडू शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला होता. तरीही, प्रशांत किशोर यांच्यावर उपचार सुरू नव्हते. अखेर पोलिसांनी पहाटे पाच वाजता गांधी मैदान गाठून प्रशांत किशोर यांना ताब्यात घेतले आणि पाटणा एम्समध्ये दाखल केले. त्यानंतर अटक केली आहे.