Prakash Raj: अभिनेते प्रकाश राज राज्यसभेवर जाणार? मुख्यमंत्री केसीआर यांच्यासोबत भेटीगाठी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 15:46 IST2022-05-13T15:46:21+5:302022-05-13T15:46:31+5:30
Prakash Raj: तेलंगणातून राज्यसभा सदस्य म्हणून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. विधानसभेत सत्ताधारी पक्ष टीआरएसची मजबूत पकड असल्याने तिन्ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

Prakash Raj: अभिनेते प्रकाश राज राज्यसभेवर जाणार? मुख्यमंत्री केसीआर यांच्यासोबत भेटीगाठी सुरू
हैदराबाद: निवडणूक आयोगाने संसदेचे उच्च सभागृह म्हणजेच राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे. आता ही जागा काबीज करण्यासाठी रस्तीखेच सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. या जागेच्या उमेदवारीसाठी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे नाव चर्चेत असतानाच सुप्रसिद्ध कलाकार प्रकाश राज (Prakash Raj) हेही उमेदवारीच्या शर्यतीत उतरले आहेत. यासाठी त्यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसोबत भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
विधानसभेतील पकड पाहता तेलंगणातील राज्यसभेच्या जागेवर टीआरएसचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळेच चित्रपट कलाकार प्रकाश राज यांनी टीआरएस अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. नुकतेच ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी इरावल्ली येथील फार्महाऊसवर पोहोचले होते. यानंतर त्यांना वरिष्ठ सभागृहात उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
याआधीही प्रकाश राज यांनी फेब्रुवारीत चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. तेलंगणातून राज्यसभा सदस्य म्हणून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या नावाचीही चर्चा जोरात सुरू आहे. विधानसभेत सत्ताधारी पक्ष टीआरएसची मजबूत पकड असल्याने तिन्ही जागा बिनविरोध जिंकण्याची खात्री आहे. तेलंगणातून राज्यसभेच्या 7 जागा आहेत, सर्व जागा टीआरएसच्या ताब्यात आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 मे आहे. राज्यसभा खासदार बंडा प्रकाश यांनी ही जागा सोडल्यामुळे एका जागेवर पोटनिवडणूक होत आहे. येथील निवडणूक 30 मे रोजी होणार आहे.