भारतामध्ये हल्ल्याची शक्यता, इस्त्राईलने दिला नागरिकांना अलर्ट
By Admin | Updated: December 31, 2016 16:56 IST2016-12-31T16:47:51+5:302016-12-31T16:56:11+5:30
नववर्षाच्या निमित्ताने भारतात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचं सांगत इस्त्राईलने परदेशी नागरिकांना चेतावणी दिली असून भारतामध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे

भारतामध्ये हल्ल्याची शक्यता, इस्त्राईलने दिला नागरिकांना अलर्ट
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - नववर्षाच्या निमित्ताने भारतात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचं सांगत इस्त्राईलने परदेशी नागरिकांना चेतावणी दिली असून भारतामध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. भारताच्या दक्षिण-पश्चिम भागात हल्ल्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. इस्त्राईलच्या दहशतवाद विरोधी संचालक मंडळाकडून यासंबंधी पत्रक जारी करण्यात आलं आहे.
'आम्ही भारतात असणा-या इस्त्राईली नागरिकांना चेतावणी दिली आहे. दहशतवादी हल्ल्याची शक्यता असून हे दहशतवादी परदेशी नागरिकांना टार्गेट करण्याची शक्यता आहे. दक्षिण-पश्चिम भागात हे हल्ले होऊ शकतात,' असं या पत्रकातून सांगण्यात आलं आहे. बीच आणि क्लबमध्ये होणा-या नवीन वर्षांच्या पार्टींमध्ये परदेशी नागरिकांची संख्या जास्त असल्याने हा मुख्य टार्गेट असू शकतो असं या चेतावणीत सांगण्यात आलं आहे.
मुंबई. गोवा, पुणे आणि कोचीन ही शहरे मुख्य टार्गेट असण्याची शक्यता आहे. नागरिकांनी बीच तसंच प्रसिद्ध ठिकाणी होणा-या पार्टीमध्ये जाणं टाळावा असा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांनी स्थानिक प्रसारमाध्यमं आणि सुरक्षायंत्रणांवर नजर ठेवावी, तसंच जागरुक राहावं असंही सांगण्यात आलं आहे. इस्त्राईल राजदूताच्या प्रवक्त्यांनी ही चेतावणी दिली असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
इस्त्राईल नागरिकांनी भारतातील त्यांच्या नातेवाईकांना फोन करुन धोक्याची माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं असून मार्केट तसंच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं असंही सांगण्यात आलं आहे.