बंगळुरू - स्टार्टअप सिटी असलेल्या बंगळुरू येथील एका रिक्षावाल्यास प्राप्ती कर विभागाने नोटीस बजावली आहे. या रिक्षावाल्याने तब्बल 1.6 कोटी रुपयांचे घर खरेदी केल्याची माहिती प्राप्तीकर विभागाला मिळाला होती. त्यानंतर, रिक्षावाला सुब्रमणी यांस ही नोटीस देण्यात आली. सुब्रमणी यांनी व्हाईटफिल्ड परिसरात एक अलिशान बंगला खेरदी केला आहे.
सुब्रमणी यांनी व्हाईटफिल्ड परसिरात जट्टी द्वारकामाई नावाने एक बंगला खरेदी केला असून त्याची किंमत 1.6 कोटी रुपये एवढी आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी बंगला खरेदी करताना सुब्रमणी यांनी खरेदीची सर्वच रक्कम रोख स्वरुपात दिली होती. सुब्रमणी यांच्याकडे बेकायदा कमावलेला काळा पैसा असून त्यांनी त्या पैशाचा कुठलाही कर भरला नसल्याची तक्रार प्राप्तीकर विभागाला प्राप्त झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी कुठलीही धाड त्यांच्या घरावर टाकण्यात आली असून संपत्तीही जप्त केली नसल्याचेही संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटले.
दरम्यान, सुरुवातीला या बंगल्यासाठी राजकीय व्यक्ती, स्थानिक आमदार यांचा पैसा असल्याचा संशय प्राप्ती कर विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना होता. मात्र, सुब्रमणी यांच्या घराची आणि घर खरेदीच्या कागदपत्रांची तपासणी केली असून त्यांना सर्व कागदपत्रे पुराव्यानिशी मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. जट्टी इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीना हा बंगला बांधला होता. त्यामुळे प्राप्तीकर विभागाने 16 एप्रिल रोजी या कंपनीला नोटीस बजावली होती. त्यामुळे सुब्रमणी यांच्याविरुद्ध कुठलाही गुन्हा नोंद करण्यात आला नाही.