राजकीय ‘छापा’संघर्ष
By Admin | Updated: December 16, 2015 04:37 IST2015-12-16T04:37:06+5:302015-12-16T04:37:06+5:30
सीबीआयने मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एका अधिकाऱ्याच्या कार्यालयावर छापा मारल्यानंतर, दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात

राजकीय ‘छापा’संघर्ष
नवी दिल्ली : सीबीआयने मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एका अधिकाऱ्याच्या कार्यालयावर छापा मारल्यानंतर, दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात या मुद्द्यावरून चांगलाच गदारोळ झाला. केजरीवालांनी आपल्या कार्यालयावर छापा मारण्यात आल्याचा दावा करीत, थेट पंतप्रधानांना लक्ष्य बनविले. मोदी हे भित्रे आणि मनोरुग्ण असल्याचा आरोपही त्यांनी केला, परंतु अर्थमंत्री अरुण जेटली आणि स्वत: सीबीआयने केजरीवालांच्या कार्यालयावर छापा मारण्यात आल्याचा दावा फेटाळला आहे. या प्रकारावरून केंद्र आणि दिल्लीच्या आप सरकारमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
सीबीआयने सकाळीच दिल्ली सचिवालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर शोधमोहीम पार पाडली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या चमूने छापा मारला, त्याच मजल्यावर केजरीवालांचे कार्यालयही आहे. गेल्या काही वर्षांत दिल्ली सरकारच्या निविदा एका फर्मला मिळवून देताना राजेंद्र कुमार यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. दिल्ली संवाद आयोगाचे माजी सचिव आशीष जोशी यांनी राजेंद्रकुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वॉरंट मिळविल्यानंतर राजेंद्र कुमार यांचे कार्यालय आणि निवासस्थानावर छापे मारण्यात आल्याचा दावाही सीबीआयने केला.
या छाप्याचे तीव्र पडसाद संसदेत उमटले. राज्यसभेत विरोधकांनी अभूतपूर्व गदारोळ घातल्यामुळे
दोनदा कामकाज तहकूब करण्यात आले. केजरीवालांच्या कार्यालयावर छापा मारण्यात आलेला नाही.
दिल्ली सरकारमधील एका अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप असल्यामुळे छापासत्र पार पडले. छाप्याचा केजरीवालांशी काहीही संबंध नाही. संबंधित अधिकाऱ्यावरील भ्रष्टाचाराचे प्रकरणही जुने आहे, अशी माहिती जेटलींनी राज्यसभेत दिली. लोकसभेतही त्यांनी हेच उत्तर दिले. तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्यावेळी हा मुद्दा उपस्थित केला. तथ्य विपर्यस्तरीत्या समोर आणले जात आहे रॉय यांनी खोट्या माहितीला बळी पडू नये असे आवाहनही
जेटलींनी केले.
१४ ठिकाणे छापे : गुन्हा दाखल
केजरीवाल सरकारचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर, तसेच दिल्ली आणि उत्तर प्रदेशात १४ ठिकाणी छापे मारण्यात आले. मात्र, केजरीवालांच्या कार्यालयात कोणतीही शोधाशोध केलेली नाही, असा खुलासा सीबीआयच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. राजेंद्रकुमार यांच्यास सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विविध छाप्यांमध्ये अडीच लाखांच्या रोख रकमेसह १६ लाख रुपयांची मालमत्ता सीबीआयने जप्त केली असून, ३ लाख रुपये मूल्याचे परकीय चलनही हाती लागले आहे.
जेटली खोटे बोलतात...
जेटली संसदेत खोटे बोलले. काही पुरावे मिळतात का, यासाठी माझ्या कार्यालयात शोध घेण्यात आला. राजेंद्रकुमार हे केवळ बहाणा होते, असे टिष्ट्वटरवर सांगत, केजरीवालांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सीबीआयने माझ्या कार्यालयावर छापा मारला असल्याचा दावा करतानाच, मोदींना मला राजकीय शह देणे जमले नाही, त्यामुळेच त्यांनी भ्याडपणा चालविला असल्याचे त्यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. दुसरे टिष्ट्वट जारी करीत त्यांनी मोदी भ्याड आणि मनोरुग्ण असल्याचे म्हटले,शिवाय सीबीआयच्या छाप्यांबद्दल संताप व्यक्त केला.
केजरीवालांनी माफी मागावी : केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भ्याड आणि मनोरुग्ण म्हटल्याबद्दल त्यांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रपरिषदेत केली. सीबीआयच्या छाप्यांबद्दल केजरीवालांनी निराधार आणि दुर्दैवी आरोप केले आहेत. त्याची निंदा करावी, तेवढी कमीच आहे. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल न्यायालयाच्या आदेशावरून प्रधान सचिव राजेंद्र कुमार गुप्ता यांच्या कार्यालयावर छापे मारले. आणखी पाच-सहा अधिकाऱ्यांविरुद्धही धाडसत्र अवलंबण्यात आले. गुप्ता यांच्यावर संगणकांचा पुरवठा करणारी इनडेक्ट सीस्टिम या कंपनीला लाभ पोहोचविल्याचा आरोप आहे.
ही तर अघोषित आणीबाणी- आप
दिल्ली सरकार आणि आम आदमी पार्टीने(आप) छापासत्राबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा ‘काळा दिवस’ असून, भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अघोषित आणीबाणी आहे, असे या पक्षाने म्हटले. केजरीवालांशी प्रामाणिक राहून काम कराल, तर त्रास दिला जाईल, असा संदेश देण्यासाठी सीबीआयने छापे मारल्याचा आरोप, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला. सीबीआय खोटे बोलत असल्याचे आपचे अन्य नेते आशुतोष यांनी म्हटले.
केंद्र सरकारशी भांडण करण्याची दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची फॅशन बनली आहे. प्रत्येक बाबीसाठी ते पंतप्रधानांचे नाव घेतात. सीबीआय सरकारच्या अखत्यारित काम करीत नाही.
- एम. वेंकय्या नायडू,
संसदीय कार्यमंत्री.
केजरीवालांनी मोदींवर टीका करताना वापरलेली भाषा पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून एका अधिकाऱ्याचा तपास केला आहे. केजरीवालांच्या कार्यालयाशी काहीही देणे- घेणे नव्हते.
- प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री.
धार्मिक असहिष्णुताच नव्हे तर राजकीय असहिष्णुताही वाढली आहे. त्यामुळेच केजरीवालांवर छापे मारण्यात आले.
- सौगत रॉय, तृणमूलचे खासदार.
सीबीआयचे छापासत्र निंदनीय असे असून राजकीय सूडाच्या भावनेने प्रेरित आहे. एखाद्या अधिकाऱ्यांवरील आरोपांचा तपास करताना मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सील करणे हे अभूतपूर्व आहे. बिगर भाजप सरकारांच्या अधिकारांवर मोदी सरकारने अतिक्रमण करताना नवी मजल गाठली आहे.
- माकपचे निवेदन
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला सील ठोकणे अभूतपूर्व असून या अप्रत्यक्ष कारवाईमुळे मी स्तंभित झाले आहे. दिल्लीच्या छाप्यांबद्दल आम्ही केंद्र सरकारला स्पष्टीकरण मागितले आहे.
- ममता बॅनर्जी,
प. बंगालच्या मुख्यमंत्री
सबळ पुराव्याविना सीबीआय कारवाई करीत नाही. याआधीही एक अधिकारी भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून जाळ्यात अडकला आहे.
- मीनाक्षी लेखी, भाजपा खासदार.