'राजकीय पक्ष, व्यवसायसमूहाच्या वृत्तपत्रांकडून मूल्यांबाबत तडजोड'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 02:49 IST2019-11-17T02:49:32+5:302019-11-17T02:49:52+5:30
‘राजा राममोहन रॉय’ पुरस्काराचे वितरण

'राजकीय पक्ष, व्यवसायसमूहाच्या वृत्तपत्रांकडून मूल्यांबाबत तडजोड'
नवी दिल्ली : राजकीय पक्ष आणि व्यवसाय समूह आपल्या दुर्हेतूसाठी स्वत:ची वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या सुरू करून पत्रकारितेच्या मूल्यांबाबत तडजोड करीत आहेत, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी केले. पत्रकारांनी सनसनाटीपासून दूर राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ‘प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात नायडू बोलत होते. पत्रकारितेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ‘राजस्थान पत्रिका समूहा’चे चेअरमन आणि ‘एडिटर इन चीफ’ गुलाब कोठारी यांना उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते ‘राजा राममोहन रॉय’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नायडू यांनी सांगितले की, अलीकडे राजकीय पक्ष आणि व्यवसाय समूह आपली स्वत:ची वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या सुरू करीत आहेत. या माध्यमातून ते आपले दुर्हेतू (व्हेस्टेड इंटरेस्ट) साध्य करीत आहेत, तसेच पत्रकारितेच्या मूल्यांबाबत तडजोड करीत आहेत. एखाद्या राजकीय पक्षाकडून वृत्तपत्र चालविले जात असेल, तर तसे त्यांनी स्पष्टपणे नमूदही करायला हवे. सनसनाटीपणाच्या या काळात सतर्क राहण्याचे आवाहन पत्रकारांना करून नायडू यांनी पुढे म्हटले की, सनसनाटी हे जणू आजचे ब्रीदच बनले आहे. तथापि, सनसनाटी बातमी म्हणजे असंवेदनशील बातमी होय. सनसनाटीपासून पत्रकारांनी दूर राहायला हवे.
खोट्या बातम्या ही मोठी समस्या -जावडेकर
माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांची या कार्यक्रमास उपस्थिती होती. जावडेकर यांनी खोट्या बातम्यांबाबत चिंता व्यक्त केली. जावडेकर म्हणाले की, आज ‘पेड न्यूज’पेक्षाही ‘फेक न्यूज’ ही मोठी समस्या बनली आहे. पत्रकारांनी आपल्या स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारीही समजून घेण्याची वेळ आली आहे.