एक राजकीय मुत्सद्दी !
By Admin | Updated: December 25, 2014 02:13 IST2014-12-25T02:13:17+5:302014-12-25T02:13:17+5:30
एक राजकीय मुत्सद्दी नेते, एक निष्णात वाक्पटू, एक संवेदनशील कवी अशी अटल बिहारी वाजपेयी यांची ओळख आहे़ काँग्रेसवगळता अन्य पक्षांचे

एक राजकीय मुत्सद्दी !
एक राजकीय मुत्सद्दी नेते, एक निष्णात वाक्पटू, एक संवेदनशील कवी अशी अटल बिहारी वाजपेयी यांची ओळख आहे़ काँग्रेसवगळता अन्य पक्षांचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले वाजपेयी भाजपाचा मवाळ चेहरा म्हणून सर्वपरिचित होते़ ९०च्या दशकात राजकारणाच्या मंचावर भाजपाला नवी ओळख देण्यात वाजपेयींचे मोठे योगदान आहे़
ओघवती वाणी आणि खंबीर नेतृत्व या जोरावर वाजपेयींची पंतप्रधानपदाची कारकीर्द गाजली़ भारत-पाकिस्तान यांच्यातील मतभेद दूर करण्याच्या दिशेने त्यांनी या काळात ठोस पावले उचलली़ याच प्रयत्नांनी त्यांना जागतिक पातळीवर नवी ओळख मिळवून दिली़ १९९९ मध्ये वाजपेयींनी पाकिस्तान दौरा केला़ त्यांच्याच पक्षाच्या कट्टरवादी नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली़ मात्र राजनैतिक रूपात, भारत-पाक संबंधातील नवे युग म्हणून याकडे पाहिले गेले़ मात्र त्यांच्याच काळात कारगील युद्ध घडले़ या युद्धात पाकिस्तानला पराभवाचे तोंड पाहावे लागले़
१९५१ मध्ये जनसंघाची स्थापना झाली़ यादरम्यान डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा उत्तर प्रदेश दौरा होता़ पत्रकार म्हणून वाजपेयी या दौऱ्यात त्यांच्यासोबत होते़ मुखर्जींना काही कारणास्तव वेळ होता म्हणून लोकांना खिळवून ठेवण्याची जबाबदारी अचानक वाजपेयींवर सोपवली गेली़ या वेळी वाजपेयींच्या वाणीने सर्वच मंत्रमुग्ध झाले़ काश्मीर आंदोलनाच्या वेळी ते मुखर्जींचे खासगी सचिव बनले आणि राजकारणात त्यांचा प्रवेश झाला़
आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील जनता पार्टी जनसंघाचे विलीनीकरण झाले़ यानंतरच्या १९७७ च्या निवडणुकीनंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले़ त्यांच्या मंत्रिमंडळात वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले़ या काळात संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीतून भाषण करणारे ते पहिले नेते ठरले़ मोरारजींनी राजीनामा दिल्यानंतर जनसंघ पुन्हा वेगळा झाला आणि १९८० मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली़ १९९६ च्या निवडणुकीत भाजपा तरला आणि वाजपेयी पंतप्रधान झाले़ मात्र हे सरकार उणेपुरे १३ दिवसांचे ठरले़ १३ महिन्यांनंतर १९९९ च्या प्रारंभी त्यांच्या नेतृत्वात बनलेले दुसरे सरकारही कोसळले़ त्यानंतरच्या निवडणुकीत अनेक मित्रपक्षांच्या साथीने भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आले आणि वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले़