अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; पत्नी निकिता यांना गुरुग्राममधून अटक, आई आणि भावाला प्रयागराजमधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 11:22 IST2024-12-15T11:21:38+5:302024-12-15T11:22:38+5:30
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी पत्नी निकिता सिंघानिया, पत्नीची आई निशा आणि भाऊ अनुराग यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; पत्नी निकिता यांना गुरुग्राममधून अटक, आई आणि भावाला प्रयागराजमधून अटक
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी विभक्त असलेली पत्नी निकिता सिंघानिया, तिची आई निशा आणि भाऊ अनुराग यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पत्नी निकिता हिला गुरुग्राममधून तर आई आणि भावाला प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अतुलने निकिता आणि त्याच्या कुटुंबीयांवर छळ आणि खंडणीचा आरोप केला होता, त्यानंतर त्याने आत्महत्या केली.
सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. शुक्रवारी बंगळुरू पोलिसांनी निकिता सिंघानियाच्या जौनपूर येथील घरावर नोटीस लावली होती. नोटीसमध्ये १५ दिवसांत जबाब नोंदवण्यास सांगण्यात आले आहे. निकिता सिंघानिया, निशा सिंघानिया आणि अनुराग सिंघानिया यांच्या वतीने अलाहाबाद उच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
पत्नी आणि सासरच्या लोकांवर छळ आणि न्याय व्यवस्थेतील त्रुटींचा आरोप करून आत्महत्या करणारे एआय अभियंता अतुल सुभाष यांनी दीड तासाच्या व्हिडिओसह २३ पानांची सुसाईड नोटही लिहिली होती. यामध्ये त्यांनी लग्नाच्या सुरुवातीपासून ते पत्नीशी झालेल्या वादापर्यंत, त्यांच्यावरील प्रत्येक केस आणि आत्महत्येकडे ढकलणारा प्रत्येक मुद्दा सविस्तरपणे सांगितला होता. आत्महत्येपूर्वी अतुलने पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा, पत्नीचा भाऊ अनुराग आणि पत्नीचा मामा सुशील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा, हुंडाबळीसाठी छळ आणि खुनासह अनेक गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बंगळुरू पोलिसांचे एक पथक शुक्रवारी यूपीमधील जौनपूर येथे पोहोचले होते जिथे पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया, मेहुणे आणि इतर राहतात. मात्र, पोलीस तेथे पोहोचले असता त्यांना निकिताच्या घराला कुलूप दिसले. निकिताची आई निशा आणि तिचा भाऊ अनुराग एक दिवस आधी घराला कुलूप लावून रात्रीच्या अंधारात कुठेतरी बाहेर गेले होते. अशा स्थितीत पोलिसांनी घरावर नोटीस चिकटवली होती. बंगळुरूमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात तुमचा जबाब नोंदवून घ्या, असे नोटीसमध्ये लिहिले होते.
अतुल सुभाष यांच्याविरोधात पत्नी निकिता सिंघानियाच्या वतीने जौनपूर न्यायालयात एकूण पाच खटले दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये निकिता सिंघानियाने नंतर घटस्फोटाचा खटला आणि सीजेएम कोर्टात खून, प्राणघातक हल्ला आणि अनैसर्गिक सेक्सचा खटला मागे घेतला. अतुल सुभाष यांच्यावर सध्या जौनपूर न्यायालयात तीन खटले सुरू आहेत. यामध्ये हुंडा प्रथा आणि प्राणघातक हल्ला संदर्भात एक खटला प्रलंबित असून त्यावर पुढील सुनावणी १२ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे.