भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्याविरोधात पोलिसांनी दाखल केला गुन्हा; प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 18:33 IST2025-01-15T18:30:48+5:302025-01-15T18:33:19+5:30
Delhi Elections 2025: भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या विरोधात निवडणूक अधिकाऱ्यांने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्याविरोधात पोलिसांनी दाखल केला गुन्हा; प्रकरण काय?
Delhi Election BJP Candidate: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक अधिकाऱ्याने प्रवेश वर्मा यांच्याविरोधात मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले होते. त्याआधारे एफआरआय नोंदवण्यात आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रवेश वर्मा यांच्याकडून आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे पत्रात म्हटलेलं आहे.
प्रवेश वर्मा यांच्यावर आरोप काय?
भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी वाल्मिकी मंदिर परिसरात मतदारांना मोफत बूट वाटले. हा प्रकार समोर आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी ओ.पी. पांडे यांनी रजनीश भास्कर यांच्याकडील व्हॉट्सअप मेसेज आधारे ही तक्रार दिली होती. वर्मा यांनी महिला मतदारांना बूट वाटल्याचे व्हिडीओतही कैद झाले आहे.
अरविंद केजरीवालांविरोधात लढत आहेत निवडणूक
भाजपचे प्रवेश वर्मा हे आपचे समन्वय आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.
बुधवारी (१५ जानेवारी) प्रवेश वर्मा यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. त्यापूर्वी त्यांनी वाल्मिकी मंदिरात जाऊन त्रिशुल आणि गदा उचलली आणि देवाच्या पाया पडले. त्यानंतर त्यांनी महिलांना स्वतःच्या हाताने बूट घातले. यावर आम आदमी पक्षाच्या नेत्यानी मतदारांना आमिष दिल्याचा आरोप केला.
WhatsApp वरून तक्रार
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने पत्रात म्हटले आहे की, 'वकील रजनीश भास्कर यांनी व्हॉट्सअपवरून तक्रार दिली आहे. प्रवेश वर्मा यांनी वाल्मिकी मंदिराच्या परिसरात नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील मतदारांना बुटाचे वाटप केले आहे. तक्रारदाराने दोन व्हिडीओही पाठवले आहेत. ज्यात प्रवेश वर्मा महिलांना बुटाचे वाटप करताना दिसत आहेत.'
'लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मधील कलम १२३ (१)(अ) नुसार कोणत्याही उमेदवाराने वा त्याच्या प्रतिनिधीने किंवा उमेदवार वा त्यांच्या एजंटच्या संमतीने कुठल्याही व्यक्तीने कोणत्याही प्रकारची भेटवस्तू, प्रस्ताव वा हमी देणे भ्रष्ट वर्तणूकीच्या अंतर्गत येते. त्यामुळे या प्रकरणाची तत्काळ कारवाई करून योग्य कारवाई करण्यात यावी', असे पत्रात म्हटलेले आहे.