Police enter Gujarat Vidyapith disrupt kite festival carrying anti CAA slogans | CAA: मोदींच्या गुजरातमध्ये विरोधाचे पतंग गुल; उडवण्यापूर्वीच पोलिसांकडून जप्त
CAA: मोदींच्या गुजरातमध्ये विरोधाचे पतंग गुल; उडवण्यापूर्वीच पोलिसांकडून जप्त

अहमदाबाद: सुधारित नागरिकत्व कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, जामिया विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापाठ यांच्यापाठोपाठ आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं गृहराज्य असलेल्या गुजरातमधील विद्यार्थ्यांनीदेखील सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) विरोध केला आहे. सीएएला विरोध दर्शवण्यासाठी गुजरात विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी या कायद्याविरोधात मजकूर असलेले पतंग उडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्याकडे असणारे पतंग ताब्यात घेतले. 

महात्मा गांधींनी भूमिपूजन केलेल्या गुजरात विद्यापीठात मकरसंक्रांत उत्साहात साजरी केली जाते. विद्यार्थी मोठ्या संख्येनं पतंग उडवतात. काल (मंगळवारी) काही विद्यार्थ्यांनी पतंग उडवण्याची तयारी सुरू केली. यापैकी काही विद्यार्थ्यांच्या पतंगावर सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातल्या घोषणा होत्या. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी लगेचच विद्यापीठ परिसर गाठला. विद्यार्थी पतंग उडवण्याच्या तयारीत असताना पोलीस विद्यापीठात दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना पतंग उडवण्यापासून रोखलं. विद्यापीठातल्या पोलिसांच्या प्रवेशाचा विद्यार्थ्यांनी विरोध केला. विद्यापीठात पोलिसांनी केलेला प्रवेश घटनाबाह्य असल्याचा आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी शांततापूर्वक आंदोलन केलं. सीएएच्या समर्थनार्थ घोषणा असलेली पतंग खुद्द गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी उडवू शकतात. मग आम्ही त्याच माध्यमातून आमचा निषेध का व्यक्त करू शकत नाही, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. 
 

Web Title: Police enter Gujarat Vidyapith disrupt kite festival carrying anti CAA slogans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.