चष्म्यामध्ये लावलेल्या कॅमेऱ्यामधून काढत होता राम मंदिराचे फोटो, पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:23 IST2025-01-07T12:22:14+5:302025-01-07T12:23:49+5:30
Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील राम मंदिरामध्ये सुरक्षाव्यवस्थेतील फार मोठी चूक समोर आली आहे. येथे एक व्यक्ती आपल्या चष्म्यामध्ये लावलेल्या कॅमेऱ्यामधून फोटो काढण्यास मनाई असलेल्या मंदिराच्या अंतर्भागातील फोटो काढत होता.

चष्म्यामध्ये लावलेल्या कॅमेऱ्यामधून काढत होता राम मंदिराचे फोटो, पोलिसांनी केली अटक
अयोध्येतील राम मंदिरामध्ये सुरक्षाव्यवस्थेतील फार मोठी चूक समोर आली आहे. येथे एक व्यक्ती आपल्या चष्म्यामध्ये लावलेल्या कॅमेऱ्यामधून फोटो काढण्यास मनाई असलेल्या मंदिराच्या अंतर्भागातील फोटो काढत होता. दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला अटक केली आहे. तसेच आता गुप्तचर यंत्रणांकडून त्याची चौकशी सुरू आहे. तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी एक जण रामललांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत आला होता. त्याने छुपे कॅमेरे लावलेला चष्मा लावला होता. एवढंच नाही तर या चष्म्यासह त्याने मंदिरा परिसरातील सर्व सुरक्षा पॉईंट विनाअडथळा पार केले होते. मात्र सुरक्षा रक्षक त्याला पकडू शकले नव्हते. त्यानंतर या व्यक्तीने राम मंदिर परिसरामध्ये फोटो काढण्यास सुरुवात केली. जेव्हा तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला फोटो काढताना पाहिले, तेव्हा त्याला तातडीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला गुप्तचर यंत्रणांच्या हवाली करण्यात आले. या व्यक्तीने डोळ्यांवर लावलेल्या चष्म्याच्या फ्रेमच्या दोन्ही टोकांवर कॅमेरे लावलेले होते. त्यामुळे त्याला सहजपणे फोटो काढता येत होते.
दरम्यान, गतवर्षी जानेवारी महिन्यात अयोध्येतील रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली होती. तेव्हापासून दररोज हजारो लोक रामललांच्या दर्शनासाठी अयोध्येत येत असतात. दरम्यान, राम मंदिर हे संवेदनशील ठिकाण असल्याने तिथे कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.