PNB Scam- मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेला सीबीआयने ठोकलं टाळं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 16:20 IST2018-02-19T16:19:47+5:302018-02-19T16:20:43+5:30
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचं मुख्य केंद्र मानलं गेलेल्या फोर्ट येथील ब्रॅडी हाऊस शाखेला सीबीआयने टाळं ठोकलं आहे.

PNB Scam- मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेला सीबीआयने ठोकलं टाळं
मुंबई- पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची जोरदार कारवाई सुरू आहे. सोमवारी सकाळपासूनही सीबीआयची ठिकठिकाणी कारवाई सुरू होती. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचं मुख्य केंद्र मानलं गेलेल्या फोर्ट येथील ब्रॅडी हाऊस शाखेला सीबीआयने टाळं ठोकलं आहे. तसंच नीरव मोदीच्या चौकशीची तयारी सीबीआयने केली आहे.
दक्षिण मुंबईतल्या काळा घोडा येथे ब्रॅडी हाऊस इमारतीत पीएनबीची शाखा आहे. बँकेच्या बाहेर सीबीआयने नोटीस लावली आहे. नीरव मोदी घोटाळाप्रकरणी ही शाखा सील करण्यात येत आहे, असं या नोटीशीत लिहिलं आहे. आता या शाखेत कोणतंही काम होणार नाही. पीएनबीच्या कर्मचाऱ्यांनादेखील येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
नीरव मोदीची दरमहा ५० कोटी देण्याची आॅफर
पंजाब नॅशनल बँकेच्या ११,४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला आघाडीचा हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी दरमहा ५० कोटी रुपये, याप्रमाणे परतफेड करून कायदेशीर देण्याची पै न पै चुकती करण्याची ताजी ‘आॅफर’ दिली आहे. शक्य असेल तर तडजोड करणे शक्य व्हावे, यासाठी मोदी सरकारने या घोटाळ्यावर कोणतेही थेट भाष्य न करता, दोन हात दूर राहून बँका आणि तपासी यंत्रणांना हे प्रकरण हाताळू देण्याचा सावध पवित्रा घेतला आहे.