मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 14:31 IST2025-09-08T13:49:40+5:302025-09-08T14:31:39+5:30
बऱ्याच काळापासून भारतीय तपास यंत्रणा चोक्सीचा शोध घेत होत्या, आता तो बेल्जियम पोलिसांच्या ताब्यात आहे.

मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्रालयाने बेल्जियम सरकारला एका पत्राद्वारे मेहुल चोक्सीला ताब्यात घेण्यासाठी औपचारिक आश्वासने दिली आहेत. जर चोक्सीला भारतात आणले तर त्याला अमानुष वागणूक दिली जाणार नाही. त्याशिवाय त्याला मेडिकलसह १४ सुविधा पुरवल्या जातील असं भारताने बेल्जियमला सांगितले आहे.
गृह मंत्रालयाने सांगितले आहे की, मेहुल चोक्सीला मुंबईच्या आर्थर रोड जेलमधील बॅरेक नंबर १२ मध्ये ठेवले जाईल. या कोठडीत ६ लोकांच्या राहण्याची क्षमता आहे. पत्र पाठवेपर्यंत बॅरेकमधील २ कोठडी रिकामी करण्यात आली होती. पळपुटा उद्योगपती मेहुल चोक्सीवर पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. भारतीय तपास यंत्रणेच्या प्रत्यार्पणाच्या आवाहनावर १२ एप्रिलला चोक्सीला अटक झाली. या प्रकरणात तो आणि त्याचा भाचा नीरव मोदी प्रमुख आरोपी आहेत.
आर्थर रोड जेलमध्ये काय काय सुविधा मिळणार?
- गर्दीपासून वेगळी असलेली १२ नंबरची कोठडी
- २० बाय १५ ची जेलमध्ये स्वतंत्र कोठडी
- कोठडीमध्ये अटॅच टॉयलेट आणि बाथरूम
- ३ वेळचे जेवण, स्वच्छ पाणी
- झोपण्यासाठी कापसाची उशी, चादर आणि अंथरूण
- कोर्टाच्या ऑर्डरवर मेटल अथवा लाकडाचा बेड
- सीलिंग फॅन आणि लाईट
- २४ तास सीसीटीव्ही
- ताज्या हवेसाठी खुले अंगण
- योग, मेडिटेशन आणि लायब्रेरी
- मनोरंजनासाठी बॅडमिंटन, बुद्धिबळ आणि कॅरम
- २४ तास आरोग्य सुविधा
- आपत्कालीन परिस्थितीत जे.जे हॉस्पिटलला सुविधा
- कोर्टाच्या ऑर्डरवर घरातील जेवणाची परवानगी
त्याशिवाय जेलच्या कोठडीत ग्रीलच्या खिडक्या, वेंटिलेटर आणि सीलिंग फॅन असेल. मुंबईत जास्त उष्णता नसते, त्यासाठी कोठडीत एसी सुविधा नाही. मुंबई जेलमध्ये दररोज साफसफाई केली जाते, स्वच्छतेकडे लक्ष दिले जाते. नियमित सफाई, पेस्ट कंट्रोल, महापालिकेकडून पाणी पुरवठा केला जातो. कोठडीत अंघोळ करण्याचीही सुविधा आहे. डॉक्टरांच्या सांगण्यांनुसार विशेष आहाराची व्यवस्था केली जाईल. २४ तास आरोग्य सुविधेत ६ मेडिकल अधिकारी, नर्स, फार्मासिस्ट आणि लॅबोरेटरीची व्यवस्था असेल. जेलमध्ये ICU सह २० बेडचे रुग्णालय आहे. आपत्कालीन परिस्थिती जवळच जे.जे रुग्णालय आहे. जेलमधील कैदी खासगी मेडिकल सुविधाही घेऊ शकतात.
दरम्यान, बऱ्याच काळापासून भारतीय तपास यंत्रणा चोक्सीचा शोध घेत होत्या. मेहुल चोक्सी २०२१ च्या अखेरीस अँटिग्वामधून पळून गेला होता, त्यानंतर भारतीय तपास यंत्रणा दोन महिने बेल्जियमच्या एजन्सींच्या संपर्कात होत्या. चोक्सी सध्या बेल्जियममध्ये तुरुंगात आहे. बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाने जारी केलेल्या दोन अटक वॉरंटच्या आधारे चोक्सीला ताब्यात घेतले. हे वॉरंट २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ रोजी जारी करण्यात आले होते.