ऑक्टोबरमध्ये मोदी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार? भारताच्या 'शेजाऱ्या'कडे शांघाय परिषदेचे यजमानपद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 11:46 IST2024-07-05T11:45:12+5:302024-07-05T11:46:39+5:30
जोवर दहशतवाद संपवत नाही तोवर भारत पाकिस्तानमध्ये खेळ, मैत्रीच्या चर्चा होणार नाहीत अशी उघड भुमिका भारताने घेतलेली आहे. तरी देखील पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत.

ऑक्टोबरमध्ये मोदी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार? भारताच्या 'शेजाऱ्या'कडे शांघाय परिषदेचे यजमानपद
लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विदेश दौरे ठरू लागले आहेत. मोदी आता रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अशातच मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत एक महत्वाची माहिती येत आहे.
पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंधांबाबत अवघ्या जगाला माहिती आहे. पाकिस्तान दिवाळखोरीत गेलेला असला तरी आजही भारतीय भूमीवर दहशतवादी पाठवित आहे. जोवर दहशतवाद संपवत नाही तोवर भारत पाकिस्तानमध्ये खेळ, मैत्रीच्या चर्चा होणार नाहीत अशी उघड भुमिका भारताने घेतलेली आहे. तरी देखील पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत.
अशातच मोदी येत्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची यंदाची परिषद पाकिस्तानात होत आहे. या बैठकीला सदस्य देशांच्या सर्व प्रमुखांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या परिषदेला पाकिस्तानचे मंत्री भारतात आले होते. यामुळे मोदी या परिषदेसाठी पाकिस्तानला जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. एससीओ सदस्यांमध्ये भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे.
तसे पाहिले तर मोदी यापूर्वी एकदा पाकिस्तानाच जाऊन आलेले आहेत. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाला मोदी परदेश दौऱ्यावरून येताना अचानक पाकिस्तानला गेले होते. मोदी यांनी नुकतीच तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली, तेव्हाही शरीफ बंधुंनी मोदींना शुभेच्छा दिल्या होत्या.
यावेळी मोदींनी त्यांचे आभार मानले होते व भारतातील लोक नेहमीच शांतता, सुरक्षा आणि पुरोगामी विचारांच्या बाजूने राहिले आहेत. आमच्या लोकांचे कल्याण आणि सुरक्षितता हे नेहमीच आमचे प्राधान्य असेल, असेही सुनावले होते.