"माझ्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी..."; राहुल गांधी यांची भरसंसदेत भविष्यवाणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 18:20 IST2024-07-29T18:20:04+5:302024-07-29T18:20:28+5:30
राहूल गांधी म्हणाले, I.N.D.I.A. आघाडीने पहिले पाऊल टाकले आहे. आम्ही आपल्या पंतप्रधानांचा आत्मविश्वास तोडला आहे...

"माझ्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी..."; राहुल गांधी यांची भरसंसदेत भविष्यवाणी!
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणादरम्यान कधीही सभागृहात येणार नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर बोलताना जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला आणि नंतर पंतप्रधान मोदींसंदर्भात भविष्यवाणी केली.
यावेळी, अर्थसंकल्पापूर्वी होणाऱ्या हलवा समारंभाचा फोटो दाखवत राहुल म्हणाले, यात एकही अधिकारी आदिवासी अथवा दलित वर्गातील नाही. ते पुढे म्हणाले. देशाचा हलवा वाटला जात आहे आणि कुणीही अदिवासी अथवा दलित तेथे उपस्थित नाही. या विधानाच्या माध्यमाने राहुल गांधी जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करत होते.
यावेळी, निर्मला सितारान यांच्याकडे बोट दाखवत राहुल गांधी म्हणाले, "अर्थमंत्री हसत आहेत. कमाल आहे. ही काही हसण्याची गोष्ट नाही, मॅडम. ही काही हसण्याची गोष्ट नाही. ही जात जनगणना आहे. यामुळे देश बदलेल." एवढेच नाही तर, "महोदय, पद्मव्यूह किंवा चक्रव्यूहच्या लोकांना वाटते की देशातील मागासलेले लोक अभिमन्यू आहेत. देशातील मागासलेले लोक अभिमन्यू नसून अर्जुन आहेत. ते तुमचे हे चक्रव्यूह तोडून टाकतील.
पुढे बोलताना राहूल गांधी म्हणाले, I.N.D.I.A. आघाडीने पहिले पाऊल टाकले आहे. आम्ही आपल्या पंतप्रधानांचा आत्मविश्वास तोडला आहे. अर्थात आपले पंतप्रधान भाषणादरम्यान येऊच शकत नाहीयेत आणि मी आपल्याला आधीच सांगतो की, ते माझ्या भाषणादरम्यान कधी येऊही शकणार नाहीत." सोमवारीही राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित नव्हते.