७८ वर्षात भारताचे पंतप्रधान पहिल्यांदाच ब्रुनेई दौऱ्यावर, आणखी दोन देशांना नरेंद्र मोदी भेट देणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 18:49 IST2024-08-30T18:39:29+5:302024-08-30T18:49:04+5:30
Narendra Modi : ब्रुनेई हा दक्षिणपूर्व आशियातील एक देश आहे.

७८ वर्षात भारताचे पंतप्रधान पहिल्यांदाच ब्रुनेई दौऱ्यावर, आणखी दोन देशांना नरेंद्र मोदी भेट देणार!
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३-४ सप्टेंबरला ब्रुनेईच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे, कारण ते ब्रुनेईला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. दरम्यान, ब्रुनेईसोबतचे द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय सहकार्याला प्रोत्साहन देणे, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे.
ब्रुनेई हा दक्षिणपूर्व आशियातील एक देश आहे. हा देश आपली समृद्धी आणि नैसर्गिक संसाधनांसाठी, विशेषतः तेल आणि वायूच्या क्षेत्रात ओळखला जातो. भारत आणि ब्रुनेई यांच्यात दीर्घकाळापासून चांगले संबंध आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भेटीमुळे हे संबंध आणखी दृढ होण्याची संधी मिळणार आहे. भारत आणि ब्रुनेई यांच्यात १९८४ मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. तेव्हापासून दोन्ही देशांनी अनेक क्षेत्रात सहकार्य वाढवले आहे. यामध्ये शिक्षण, आरोग्य आणि संस्कृतीचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामध्ये व्यापार, गुंतवणूक आणि सुरक्षा सहकार्य यांचा समावेश आहे. भारत आणि ब्रुनेईमधील व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी विविध करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाऊ शकतात. याशिवाय, नरेंद्र मोदी हे ब्रुनेईचे सुलतान यांच्याशी चर्चा करणार आहेत, ज्यामुळे दोन्ही देशांमधील वैयक्तिक संबंधही वाढतील.
सिंगापूर आणि अमेरिका दौराही करणार
ब्रुनेई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेईच्या विविध भागांना भेट देतील आणि तेथील लोकांची भेट घेतील. यानंतर ते सिंगापूर आणि अमेरिकेला भेट देतील. नरेंद्र मोदी ४-५ सप्टेंबरला सिंगापूरला भेट देणार आहेत. या दौऱ्यात नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र महासभेसह अनेक आंतरराष्ट्रीय मंचावरही सहभागी होणार आहेत. याशिवाय, नरेंद्र मोदींना SCO परिषदेसाठी पाकिस्तानला भेट देण्याचे निमंत्रण मिळाले आहे.