PM Narendra Modi Ayodhya Ram Mandir Dhwajarohan Ceremony: संपूर्ण भारत आणि जग राममय झाले आहे. प्रत्येक रामभक्ताचे हृदय आनंद आणि समाधानाने भारलेले आहे. प्रत्येक जण अमर्याद कृतज्ञतेचा अनुभव करत आहे. अथांग अलौकिक आनंदात न्हाऊन निघाला आहे. शतकानुशतके झालेल्या वेदना आता शांत होत आहेत. शतकानुशतके केलेल्या संकल्पाची पूर्तता होत आहे. ज्या यज्ञाचा अग्नि ५०० वर्षे प्रज्वलित होता त्याची पूर्ती होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अयोध्येत पूर्ण झालेल्या राम मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले.
अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजारोहण सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक राजकीय नेते, मान्यवर, निमंत्रित पाहुणे आणि शेकडो साधू-संत-महंत उपस्थित होते. हा धर्मध्वज फक्त एक ध्वज नाही. तो भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा ध्वज आहे. यातील भगवा रंग, सूर्यवंशाचे चिन्ह आहे, 'ओम' शब्द आणि कोविदार वृक्ष रामराज्याच्या वैभवाचे प्रतिरूप आहेत. हा ध्वज एक संकल्प आहे. संघर्षाची गाथा आहे. शंभर वर्षांच्या संघर्षाचे भौतिक स्वरूप आहे. येणाऱ्या हजारो शतकांपर्यंत, हा ध्वज श्रीरामांच्या मूल्यांचा प्रचार करेल. सत्य हाच धर्म आहे. कोणताही भेदभाव नसेल. शांतता आणि आनंद असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
श्रीराम काल्पनिक होते असे म्हणणारी गुलामी संपवू
१८३५ मध्ये थॉमस मॅकॉले यांनी भारतीय संस्कृती आणि भारतीय मूल्ये मूळापासून उखडून टाकण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली होती. १८३५ मध्ये मॅकॉले शिक्षण प्रणाली सुरू झाल्यापासून २०० वर्षे पूर्ण होत असताना २०३५ पर्यंत भारताने गुलामीच्या मानसिकतेपासून मुक्त होण्याचा संकल्प केला पाहिजे. पुढील १० वर्षे आपल्याला भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्याचे ध्येय घेऊन पुढे जायचे आहे, असा एक मोठा संकल्प पंतप्रधान मोदी यांनी देशाला दिला आहे. या गुलामगिरीच्या मानसिकतेचा पगडा एवढा जबरदस्त आहे की, श्रीराम काल्पनिक होते, असेही म्हटले गेले. परंतु, आता श्रीराम काल्पनिक होते असे म्हणणारी गुलामी संपवू, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, श्रीराम ही एक केवळ एक व्यक्ती नाही, ते एक मूल्य आहे. जर आपल्याला २०४७ पर्यंत भारताला विकसित करायचे असेल तर आपल्याला स्वतःमधील श्रीरामाला जागृत करावे लागेल. या संकल्पासाठी आजपेक्षा चांगला दिवस कोणता असू शकतो? गेल्या ११ वर्षांत समाजातील प्रत्येक घटक, महिला, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, वंचित, शेतकरी, कामगार आणि तरुण यांना विकासाच्या केंद्रस्थानी आणले गेले. २०४७ ला देश स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा विकसित भारत निर्माण करण्याचे ध्येय पूर्णपणे साध्य झाले पाहिजे. पुढील एक हजार वर्षांसाठी भारताचा पाया मजबूत करायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
Web Summary : PM Modi consecrated Ayodhya's Ram Mandir, urging India to shed its slave mentality by 2035. He emphasized awakening the inner Ram to achieve a developed India by 2047, building a strong foundation for the next millennium, promoting equality and peace.
Web Summary : पीएम मोदी ने अयोध्या के राम मंदिर में धर्मध्वजारोहण किया और 2035 तक भारत को गुलामी की मानसिकता से मुक्त करने का आह्वान किया। उन्होंने 2047 तक विकसित भारत के लक्ष्य को प्राप्त करने के लिए आंतरिक राम को जगाने, समानता और शांति को बढ़ावा देने पर जोर दिया।