India Independence Day 2022: “भारताने जे ठरवलं, ते पूर्ण करून दाखवलं, आता ‘पंचप्रण’ संकल्प करायचाय”: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 08:39 IST2022-08-15T08:38:04+5:302022-08-15T08:39:07+5:30
India Independence Day 2022: पुढील २५ वर्ष देशासाठी अत्यंत महत्त्वाची असून, पुन्हा एकदा बलसागर भारत घडवण्याची पाच मोठे संकल्प करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

India Independence Day 2022: “भारताने जे ठरवलं, ते पूर्ण करून दाखवलं, आता ‘पंचप्रण’ संकल्प करायचाय”: पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली: संपूर्ण देशभरात भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करून देशवासीयांना संबोधित केले. भारताची विविधता हीच भारताची खरी ताकद आहे. भारत ही लोकशाहीची जन्मभूमी आहे. लोकशाही हेच भारताचे खरे सामर्थ्य आहे. देशातील सामूहिक चेतना हीच देशाची ऊर्जा आहे. देशासमोर येणाऱ्या कोणत्याही संकटाना पूर्ण ताकदीने सामोरे गेला. आतापर्यंत भारताने जे ठरवले, ते करून दाखवले. आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशवासीयांनी पाच संकल्प करणे आवश्यक आहे. या संकल्पातून पुन्हा एक बलसागर भारत घडवायचा आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
आता मोठ्या संकल्पाने चालायचे आहे. मोदी देशाला आता मोठा संकल्प घेऊन चालावे लागणार आहे. विकसित भारत, त्यापेक्षा कमी आता काही होणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासींनी कोणते पंचप्राण संकल्प करावेत, याबाबत सांगितले.
पंतप्रधान मोदींचे पंचप्रण संकल्प
पंतप्रधान मोदींनी पहिला संकल्प सांगितला विकसित भारत घडवण्याचा. दुसरा संकल्प म्हणजे, गुलामीचा एकही अंश भारतातील कोणत्याही भागात नाही. तसेच यापुढेही तो राहता कामा नये. शेकडो वर्षातील गुलामीला नष्ट करायची आहे. तिसरा संकल्प म्हणजे आपल्याला आपल्या वारसा जपायचा आहे. आपल्या वारसावर आपल्याला गर्व असायला हवा. चौथा संकल्प एकतेचा आहे. पाचवा संकल्प हा नागरिकांच्या कर्तव्यांचा आहे. यामध्ये अगदी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशाता प्रत्येक नागरिक येतो, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. तसेच भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. पुढील २५ वर्षे देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
प्रत्येक भारतीयाला तिरंगा ध्वजामुळे प्रेरणा मिळाली
महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मरण करण्याची ही वेळ आहे. प्रत्येक भारतीयाला तिरंगा ध्वजामुळे प्रेरणा मिळाली. कोरोनाच्या काळात भारताने हार मानली नाही. स्वांतत्र्याच्या दीर्घ कालखंडानंतरही भारताने आपला प्रभाव कायम ठेवला. देशासमोर अन्नाच्या कमतरतेपासून ते कोरोनापर्यंत अनेक संकटे आली. देशाला मोठ्या युद्धांना सामोरे जावे लागले. मात्र, देशाने कधीही पराभव स्वीकारला नाही. देश सर्व संकटांना सामर्थ्याने आणि ताकदीने सामोरा गेला, असे पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, भारताला मिळालेला वारसा जगासमोर आदर्श आहे. योग, आयुर्वेदसारखी क्षेत्र जगासमोर आदर्श आहे. सामर्थ्यामुळेच जगाचे भारताकडे लक्ष आहे, असे सांगत राजकारणात सर्वसमावेशकता असेल तर विकासाला चालना मिळेल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आम्हाला गर्व आहे. भारतातील प्रत्यके घटक अमृत महोत्सव साजरा करत आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची ही मोठी पहाट आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.