नरेंद्र मोदींच्या 'त्या' ४ इच्छा, ज्या त्यांनी पहिल्यांदा CM झाल्यावर पूर्ण केल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:00 IST2025-01-10T16:57:46+5:302025-01-10T17:00:08+5:30
तो दिवस माझ्या कायम आठवणीत राहिला, गुजरातचे राज्यपाल, हजारो लोक त्या सोहळ्यासाठी उपस्थित होती असं मोदींनी सांगितले.

नरेंद्र मोदींच्या 'त्या' ४ इच्छा, ज्या त्यांनी पहिल्यांदा CM झाल्यावर पूर्ण केल्या
नवी दिल्ली - मुख्यमंत्री झाल्यावर माझ्या मनात अनेक इच्छा होत्या, त्यातील पहिली इच्छा शाळेतील मित्रांना बोलवायचे ते बोलवले. माझी दुसरी इच्छा होती जी कदाचित देशातील लोकांना अजब वाटेल. मी माझ्या शिक्षकांचा सार्वजनिक सन्मान करावा असं माझ्या मनात आलं. मला लहानपणापासून ज्यांनी शिकवले, शाळेत शिक्षण दिले जे शिक्षक आहेत त्या सगळ्यांना मी शोधले. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्या सर्वांना जाहीरपणे सत्कार केला अशी आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली. निखिल कामथ यांनी घेतलेल्या पहिल्याच पॉडकास्ट मुलाखतीत मोदी बोलत होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या मुलाखतीत नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, मी शिक्षकांच्या सन्मानाचा कार्यक्रम ठेवला तेव्हा आमचे राज्यपाल होते तेदेखील या सोहळ्याला आले. गुजरातमधील बरीच लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. मी जे काही बनलोय, त्यात या शिक्षकांचेही योगदान आहे असा संदेश मला द्यायचा होता. अनेक शिक्षक आले होते, त्यातील सर्वाधिक वय असणारे शिक्षक ९३ वर्षाचे होते. ३०-३२ शिक्षकांना बोलावले होते. त्या सगळ्यांचा मी जाहीर सत्कार केला, तो दिवस माझ्या कायम आठवणीतला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच माझं आयुष्य एका भटकत्या व्यक्तीसारखं होते परंतु जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्या मनात काही इच्छा जागरुक झाल्या. मला ओळखणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला मी फार मोठा माणूस झालोय असं वाटू नये, मी तोच आहे ज्याने काही वर्षापूर्वी गाव सोडलं होते. माझ्यात बदल झाले नाहीत. मला ते क्षण जगायचे होते. ते जगण्यासाठीच मला मित्रांसोबत बसायचे होते. काहींचे चेहरेही मी ओळखू शकत नव्हतो. अनेकांचे केस पांढरे झाले होते. चेहऱ्यात बदल झाले होते. मी त्या सगळ्यांना बोलावले, जेवण वैगेरे केले, रात्री गप्पा मारल्या पण मला त्यात आनंद मिळाला नाही कारण मी त्यांच्यात मित्र शोधत होतो परंतु त्यांच्या नजरेत मी मुख्यमंत्री होतो. माझ्या आयुष्यात कुणी तू म्हणून हाक मारणारा राहिला नाही. आजही काही संपर्कात आहे परंतु ते मोठ्या सन्मानाने माझ्याकडे पाहतात असं मोदींनी जुनी आठवणी सांगितली.
त्याशिवाय माझे जे कुटुंब होते, भाऊ, बहिणी त्यांची मुले त्यांनाही मी फार ओळखत नव्हतो. कारण मी सर्व सोडले होते. एकेदिवशी मी मुख्यमंत्री निवासस्थानी सगळ्यांना बोलावले. सगळ्यांचा परिचय केला. हा कुणाचा मुलगा आहे, याचे लग्न कुठे झालंय वैगेरे..विचारपूस केली. या व्यतिरिक्त मी सुरुवातीच्या काळात संघ परिवारात वाढलो, तिथे जेवण मिळायचे अनेक कुटुंबाने मला जेवण दिले होते. त्यांनाही मी घरी बोलावून त्यांची विचारपूस केली. माझ्या राजकीय जीवनात मी या ४ गोष्टी केल्या. शाळेतील मित्रांना बोलावले, ज्यांच्या घरी मी जेवायचो त्या कुटुंबाला बोलवले, माझ्या स्वत:च्या कुटुंबातील लोकांना बोलावले आणि मी माझ्या शिक्षकांचा सन्मान केला असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.